संभाजी भिडेंचे ‘ते’ वक्तव्य असंवेदनशीलतेचा कळस, त्यांनी जाहीर माफी मागावी – राष्ट्रवादी

sambhaji bhide

मुंबई – देशात आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. त्यात काही ठिकाणी वाढत्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवताना शासन आणि प्रशानसनावर प्रचंड ताण येत आहे. सरकारी यंत्रणा हतबल ठरत आहेत. वाढत्या मृत्यूदराबरोबरच भीतीही वाढत आहे.

अवघे जग या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी कोरानाची साथ आणि कोरोनाबळींबाबत वादग्रस्त विधान केले आहे.कोरोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान संभाजीराव भिडे यांनी आज येथे केले आहे.

सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात भिडे सहभागी झाले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.ते म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य शासन लोकांना उल्लू बनवत आहे. त्यांना काहीच कळत नाही. मास्क लावायची गरज आहे का? एकीकडे दारू सुरु आहे, लोक गांजा ओढत आहेत. अफू सुरु आहे, मग मास्कने काय होणार आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

एवढ्यावरच न थाबता भिडे यांनी कोरोनाच्या अस्तित्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले,मुळात कोरोना अस्तित्वात आहे का, हा प्रश्न महत्वाचा आहे. तो मानसिक आजार आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला अजिबात अक्कल नाही’ असं म्हणत सरकारवर देखील तोफ डागली.

दरम्यान, भिडे यांच्या या वक्तव्याचे आता राजकीय पडसाद देखील पाहायला मिळत आहेत.करोनामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नव्हती हे असे वक्तव्य करून संभाजी भिडे यांनी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत असं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले.

करोनामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरातील कित्येक कर्ती माणसं, आई-बहिण, वृद्ध तर गेलीच आहेत शिवाय समाजाने चांगले डॉक्टर्स, आरोग्यकर्मी, पोलिस बांधवही गमावले आहेत. आज राज्यात संपूर्ण यंत्रणा एकवटून या संकटाचा सामना करत आहे. अशावेळी जर प्रोत्साहनात्मक काही बोलता येत नसेल तर किमान खच्चीकरण करणारी वक्तव्ये करू नयेत, हे भिडेंना कोणीतरी समजवावे त्यांचे हे वक्तव्य असंवेदनशीलतेचा कळस आहे. त्यांनी देशातील नागरिकांची जाहीर माफी मागावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :