मिशन चांद्रयान 2 : ‘अमेरिकेने एकादशीला यान सोडल्याने यशस्वी झाले’

sambhaji bhide guruji

टीम महाराष्ट्र देशा : भारताच्या चांद्रयान 2 या मोहिमेला धक्का बसला आहे. चंद्रावर उतरण्यासाठी अवघे २.१ किलोमीटर अंतर बाकी असताना लँडर विक्रमशी इस्रोशी असणारा संपर्क तुटला आहे. चंद्रयान 2 मोहिमेत सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अखेरच्या १५ मिनिटांत ही घटना घडली. इस्त्रोचे शास्त्रज्ञ विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. शास्त्रज्ञांच्या या कामिगीरीवर संपूर्ण देशाला गर्व आहे.

यावरून संभाजी भिडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अमेरिकेने आतापर्यंत ३८ वेळा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. तेव्हा नासाच्या वैज्ञानिकाने भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि उपग्रह सोडला आणि तो यशस्वी झाला. अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडला कारण त्या दिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते. त्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला असं विधान भिडे यांनी केले आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नसून एक सेकंदांचा हजारावा भाग मोजण्याची पद्धत सुद्धा भारतीय कालपमापन पद्धतीमध्ये आहे. अमेरिकेने याच कालमापन पद्धतीचा वापर केल्यामुळे त्यांचा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयोग यशस्वी झाला असं विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे भारतालाही याच पद्धतीचा अवलंब केला पाहिजे असं त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जरी विक्रमशी असणारा संपर्क तुटला असला तरी ऑर्बिटरद्वारे मोहीमेचा बराचसा भाग पूर्ण करता येणार आहे. सध्या काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे भारताची ही मोहीम अयशस्वी झाली असं म्हणता येणार नाही. जर इस्रोचा विक्रमशी पुन्हा संपर्क झाल्यास ही मोहीम पूर्ण होणार आहे.