आठवलेंची सभा उधळण्यासाठी खास पुण्याहुन आले होते समता सैनिक दलाचे कार्यकर्ते

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार दिन कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे भाषण सुरू होताच गोंधळ घालून आरडाओरडा करायचा, त्यामुळे पोलिस लाठीचार्ज करतील. लाठी पडताच सभा उधळून लावायची, असे नियोजन करून काही तरुण सभेत आले होते, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना खुबीने बाजूला घेतले आणि सभा उधळण्याचा मनसुबा हाणून पाडला. या प्रकरणात मनोज भास्कर गरबडे (३०), उमेश धर्मू सूर्यगंध (३३), सुरेश रघुनाथ भालेराव (५९), आकाश भाऊसाहेब इसगल (२५), सुयोग सुहास होपाळ (२८) या पाच जणांना अटक करण्यात आली असून ते पिंपरी चिंचवड येथील समता सैनिक आहेत. छावणी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाठीचार्ज न करण्याचा पोलिसांनी घेतला होता निश्चय

कितीही गोंधळ झाला तरी लाठीचार्ज करायचा नाही, असा निश्चय पोलिसांनी केला होता. आंबेडकरी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीतदेखील पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी लाठीचार्ज होणार नाही, असे सांगितले होते. त्यानुसार गोंधळ घालणाऱ्यांची समजूत काढून त्यांना बाजूला घेण्यात आले. त्यामुळे सभा उधळण्यासाठी आलेल्यांचे नियोजन फसले.