समाजकारण हेच खरे जीवन – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

जळगाव  : मनुष्याला खऱ्या अर्थाने घडविण्याचे काम समाज करीत असतो. राजकारण हे क्षणिक असून समाजकारण हेच खरे जीवन आहे. त्यामुळे या समाजाचे ऋण प्रत्येकाने फेडलेच पाहिजे, असे प्रतिपादन महसुल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले. डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथील कांताई सभागृहात दीपस्तंभ पुरस्कांराचे वितरण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी बोलतांना पाटील म्हणाले की, दीपस्तंभच्या मनोबलचे कार्य बघून मनात रुजणारी अनुभूती मिळाली. समाजात अनेक संस्था विविध सामाजिक कार्य करीत असतात. परंतु ते आपणाला माहिती नसते. या पुरस्कारांच्या निमित्ताने समाजातील अनेक व्यक्तींचा व संस्थांचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय झाला. त्यांचे कार्य समाजाला पुढे नेणारे आहे. दीपस्तंभच्यावतीने मनोबलमधील विद्यार्थ्यांसाठी इमारत बांधण्यात येत असून या इमारतीच्या बांधकामासाठी ६ कोटी रुपये खर्च येणार आहे. या इमारतीच्या बांधकामावर दरमहा होणाऱ्या खर्चापैकी निम्मी रक्कम संस्थेला देण्यात येईल. असे यावेळी पालकमंत्र्यांनी जाहीर केले.

यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते वा. ना. अभ्यंकर यांना दीपस्तंभ जीवनगौरव पुरस्कार, इंद्रजित देशमुख आणि स्नेहालय, अहमदनगर या संस्थेचे गिरीश कुलकर्णी यांना दीपस्तंभ विवेकानंद पुरस्कार, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती चे प्रा. राजकुमार देशमुख आणि सागर रेड्डी यांना दीपस्तंभ कर्मवीर पुरस्कार तर हर्षल विभांडीक आणि आशा फाउंडेशन, जळगाव चे डॉ. हितेंद्र दहिवदकर यांना दीपस्तंभ युवा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.