जे ब्बात !‘त्या’ ग्राहकाची दाढी, केस न कापण्याचा नाभिक संघटनेचा निर्णय

नागपूर : आजकाल तर मिशी-दाढी ठेवणं हा एक ट्रेंड झाला आहे. अनेक तरुण मिशी आणि दाढी ठेवतात. अशाच एका व्यक्तिच्या प्रिय मिशीवर सलून चालकाने वस्तरा चालवला. मग काय, मिशी कापल्याने संतापलेल्या व्यक्तीने थेट पोलीस ठाणे गाठून या सलून चालकाविरोधात तक्रार दाखल केली.परवानगी शिवाय मिशी कापणं सलून चालकाला चांगलंच महागात पडलं. नागपूरच्या कन्हान येथे न विचारता मिशी कापली म्हणून एका सलून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित व्यक्तीच्या तक्रारीवरुन कन्हान पोलिसांनी सलून चालकाविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करुन तपास सुरू केला आहे. पोलीस ठाण्यात अशा प्रकारची ही पहिलीच तक्रार आहे, त्यामुळे या सलून चालकावर काय कारवाई करायची या संभ्रमात सध्या पोलीस आहेत. पुरुषांसाठी मिशीचं किती महत्त्व असतं हे या घटनेवरुन दिसून येतं. सध्या कन्हान परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे.

आता या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. यापूढे तक्रार करणाऱ्या किरण ठाकूरला दाढी आणि केस कापण्यासाठी वणवण फिरावं लागण्याची शक्यता आहे.कारण, किरणची यापुढे दाढी, केस न कापण्याचा निर्णय ग्रामीण नाभिक संघटनेने घेतला आहे. याशिवाय ग्रामीण नाभिक संघटनेने याप्रकरणी आंदोलनाचाही इशारा देखील दिला आहे. किरण ठाकूरने यापूर्वीही अनेकदा मिशी कापली होती. पण आता तो फक्त स्वतःच्या प्रसिद्धीकरता या प्रकरणाचा गाजावाजा करत आहे, असं ग्रामीण नाभिक संघटनेचं म्हणणं आहे.