…तर दीपक साळुंखे पाटलांना कोल्हापुरी चपलेने मारू : सक्षणा सलगर

पुणे : सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिप मध्ये त्यांनी अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या असल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी उडी घेतली आहे. जर आ.साळुंखे या प्रकरणात दोषी असतील तर आम्ही कोल्हापुरी चपलेने त्यांना मारू असा इशारा सलगर यांनी दिला आहे. त्या पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

नेमकं काय म्हणाल्या सलगर ?
राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस महिलांचा अपमान कदापि सहन करणार नाही. महिलांचा अवमान करणारे राम कदम असो दीपक आबा असो किंवा स्वतः मुख्यमंत्र्यांनी जरी महिलांचा अनादर केला तर सर्वाना एकच न्याय दिला जाईल. आमदार राम कदम मला राज्यात कुठेही भेटू दे त्याचं तोंड आम्ही कोल्हापुरी चपलेने फोडू, माझी कोल्हापुरी चप्पल राम कदमची वाट पाहत आहे.

व्हायरल झालेली क्लिप ही जर दीपक साळुंखे यांची नाही याचा मला विश्वास आहे. साळुंखे आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलं गेलं आहे. मात्र जर या प्रकरणात साळुंखे यांच्यावरील आरोप सिध्द झाले तर त्यांना देखील कोल्हापुरी चपलेने मारू.

कोण आहेत सक्षणा सलगर ?
मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या असलेल्या सलगर या इंजिनिअर आहेत. त्याचं मूळ गावं तेर असून त्यांची २०१६ मध्ये राज्याची स्टार प्रचारक म्हणून निवड केली होती. शिवाय त्या पक्षाच्या प्रवक्त्या म्हणूनही काम करीत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण ?

राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने साळुंखे पाटलांना फोन करुन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केव्हा करणार याबाबत विचारणा केली असता, त्यांनी पक्षातील महिला पदाधिकारी आणि सोलापुरातील ज्येष्ठ नेत्यांबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मोतीराम चव्हाण आणि दीपक आबा यांच्यातील मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून या क्लिपमध्ये दीपक आबा अक्कलकोट महिला तालुका अध्यक्षांविषयी शिवराळ भाषेत बोलत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. दरम्यान,प्रकरण अंगाशी येऊ लागताच दीपक साळुंखे पाटील यांनी ऑडिओ क्लिप मधील आवाज आपला नाही असा दावा केला आहे . हे तर आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी लिगल सेलचे अध्यक्ष लवकरच पोलिसांत तक्रार दाखलकरू असं सांगितलं होतं.

नेमकं काय म्हटलं आहे या ऑडिओ क्लिप मध्ये ?

“शरद पवार आहेत तो पर्यत माझं कोणी सुद्धा वाकडं करू शकत नाहीत. त्या ‘बाई’ला ****आला असेल तर दे म्हणावं राजीनामा, **** कार्यकर्त्यांना मी भीक घालत नाही. कोणत्या **** राजीनामा द्यायचा आहे त्यांनी खुशाल द्यावा. मोहिते पाटलांचे चमचे, **** लोकांनी आपल्याला पक्ष निष्ठा शिकवू नये”… अशा प्रकारचे बेताल आणि शिवराळ संभाषण या ऑडियो क्लिपमध्ये आहे. त्यामुळे पक्षाच्या महिला व इतर पदाधिकाऱ्याबाबत अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या साळुंखे पाटलावर पक्षांचे ज्येष्ठ नेते काय कारवाई करतात, की त्यांना पाठीशी घालतात याकडे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.