fbpx

सोलापूर आणि माढा मतदारसंघात ‘शिंदे’शाही अवतरणार : सक्षणा सलगर

सोलापूर- ( प्रतिनिधी ) – राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असल्याने सोलापूर आणि माढा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत सुशीलकुमार शिंदे आणि संजय शिंदे निवडून येऊन ‘शिंदे’शाही अवतरेल असा ठाम विश्वास राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी व्यक्त केला. मावळ मधून राष्ट्रवादीचे युवा उमेदवार पार्थ पवार तर जिंकतील असेही सलगर यांनी सांगितले.

सक्षणा सलगर म्हणाल्या, सामान्य घरातील मुली राजकारणात याव्यात म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना केली. स्थानिक स्वराज्य संस्थेत शरदचंद्र पवार यांनी महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. सोलापूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि तो अबाधितच राहणार आहे. सोलापुरात राष्ट्रवादी सक्षमपणे उभारली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीच्या प्रचारासाठी सोलापुरात आलो आहेत. महाराष्ट्रात १ कोटी ५० लाख नवीन मतदार तयार झाले आहेत. तो मतदार १८ ते २० मधला आहे. या युवकांना राष्ट्रवादीची ध्येयधोरणे सांगण्यासाठी सोलापुरात बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीत कॉर्नर बैठकांवर भर दिला जाणार आहे. कॉलनी आणि वॉर्डावॉर्डात बैठक होणे गरजेचे आहे. त्यामध्ये नवा मतदार आकर्षित झाला पाहिजे.

राज्यात राष्ट्रवादीच्या १५ ते १६ उमेदवार निवडून येतील त्यामध्ये पहिल्या पाचमध्ये माढा मतदार संघाच्या उमेदवाराचा समावेश असेल . २००९ साली शरद पवार उभारले असताना देशात त्यांनी रेकॉर्ड केले. त्यानंतर लाटेतही राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे. नेटवर्किंग चांगले असल्यानेच राष्ट्रवादीला यश मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सर्वजण आहोत. भाजपाकडे उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीमधून उमेदवार आयात करण्याची वेळ भाजपवर आली आहे. राष्ट्रवादीकडे सक्षम पर्याय आहे. संजय शिंदे हे राष्ट्रवादीचेच होते आणि आता तर अधिकृत प्रवेश केल्याने आता संजयमामा राष्ट्रवादीचे झाल्याचेही सलगर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे, सुहास कदम , लता ढेरे, सिया मुलाणी , अश्विनी भोसले , शाम गांगर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

Attachments area