भगव्या झेंड्यावरून पवार काका – पुतण्यात दुमत

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भगव्या झेंड्याचा वापर सुरु केला आहे. मात्र या भगव्या झेंड्याबाबत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दुमत असल्याचं समोर आल आहे. कारण प्रचारात किंवा पक्षाच्या कार्यक्रमात भगव्या झेंड्याचा वापर करणे ही पक्षाची भूमिका नसून अजित पवार यांची वैयक्तिक भूमिका आहे, असे म्हणत शरद पवार यांनी भगव्या झेंड्याला असमर्थन दर्शवले आहे.

भगव्या झेंड्याच्या वापराबाबत शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभांमध्ये किंवा रॅलींमध्ये भगवा झेंडा वापरण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नसून तो अजित पवार यांचा आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रचारात भगव्या झेंड्याचा वापर करणे हे कारण, अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर काका – पुतण्यांमध्ये दुमत असल्याचं समोर आल आहे.

दरम्यान ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने हाती घेतलेल्या भगव्या झेंड्यावरून अनेक पक्षांनी टीका केल्या होत्या. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याचे समर्थन केले होते. भगवा झेंडा हा शिवसेनची मक्तेदारी नसून तो शिवरायांचा झेंडा आहे. त्यामुळे इथून पुढे कोणत्याही कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या झेंड्या बरोबर भगवा झेंडाही असेल अशी घोषणा अजित पवार यांनी केली होती. मात्र अजित पवारांनी स्वत: या संदर्भात जाहीर आदेश दिला असला तरी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या संदर्भात कोणतीच भूमिका जाहीर केलेली नव्हती.