fbpx

साध्वी प्रज्ञा सिंह यांची उमेदवारी हा आमचा सत्याग्रह : अमित शहा

टीम महाराष्ट्र देशा : भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारीवर भाष्य केले आहे. काँग्रेसनं खोटी हिंदू दहशतवादाची संकल्पना आणली. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह यांची उमेदवारी काँग्रेसच्या विरोधातील आमचा सत्याग्रह आहे. असे अमित शहा यांनी म्हंटले. दिल्लीत भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या १९ तारखेला होणार आहे. त्यामुळे आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. याचदरम्यान दिल्लीत भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी मी काँग्रेस पक्षाला विचारू इच्छितो की, समझोता एक्स्प्रेसमध्ये काही लोकांना पकडण्यात आलं. एक खोटी केस बनवून हिंदू दहशतवादाचं त्याला नाव देण्यात आलं. समझोता एक्स्प्रेसमधील लोकांची निर्दोष मुक्तता झाली असून, त्यांना ५ -५ लाखांचा मोबदलाही मिळाला आहे. काँग्रेसनं देशाच्या सुरक्षेबरोबर समझोता केला. त्याबद्दल काँग्रेसनं पूर्ण जगासमोर माफी मागायला हवी. असे अमित शहा यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, काँग्रेसनं खोटी हिंदू दहशतवादाची संकल्पना आणली. विनाकारण लोकांना त्रास देण्याचं काम केलं. केवळ मतांच्या धुव्रीकरणासाठीच काँग्रेसनं असं केलं आहे. त्यामुळे आम्ही साध्वी प्रज्ञा सिंह याना उमेदवारी दिली आहे. त्यांची उमेदवारी ही काँग्रेसच्या विरोधातील आमचा सत्याग्रह आहे. असेही अमित शहा यांनी म्हंटले.