व्हिलचेअरवर असणाऱ्या साध्वी प्रज्ञांनी खेळला गरबा; काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर करत टीकास्त्रांचा वर्षाव

sadhvi pradnya

भोपाळ : भोपाळच्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांना काही व्याधींमुळे नीट चालत येत नसल्याने त्या नेहमीच व्हिलचेअरवर वावरतात. परंतु दुर्गा पुजेच्या पंडालमध्ये साध्वींनी चक्क गरबा केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर टीकास्त्रांचा वर्षाव करण्यात येत असून साध्वींचा गरबा खेळतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मंगळवारी रात्री साध्वी एका पंडामध्ये देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. देवीचे दर्शन घेतल्यानंतर उपस्थित महिलांनी साध्वी प्रज्ञा यांना गरबा खेळण्याचा आग्रह केला असता साध्वी प्रज्ञांनी महिलांसोबत गरबा नृत्य केले. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी साध्वींचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ ट्विट करत ‘साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर तुम्हाला निरोगी पाहून आनंद झाला. आज तुम्ही गरबा खेळताना दिसल्या. फक्त जेव्हा सर्वसामान्य लोक अडचणीत असतात, मदतीसाठी तुम्हाला हाक देत असतात तेव्हाच तुम्ही आजारी असता. तुम्हाला कुणाच्यातरी मदतीने चालताना पाहून किंवा व्हीलचेअरवर पाहून लोकांनाही दुःख होतं. देव तुम्हाला कायम निरोगी ठेवो’ असा टोला लगावला आहे.

दरम्यान, यापूर्वी साध्वी प्रज्ञांचा बास्केटबॉल खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हाही काँग्रेसने साध्वींवर टीका करत व्हिलचेअरवर वावरणारी व्यक्ती इतक्या स्फुर्तीने बास्केटबॉल कशी खेळू शकते, असा सवाल केला होता.

महत्वाच्या बातम्या