पूरग्रस्त लोकांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे राहणार : सदाभाऊ खोत

टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम महाराष्ट्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आता पूर ओसरला असला तरी नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच राज्य सरकार आणि विविध सामाजिक संस्था पूरग्रस्तांना मदत करताना दिसत आहेत. त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त साखर कारखाना व टाकळीवाडी येथील पूरग्रस्त नागरिकांची भेट घेतली. तसेच कारखाना कार्यस्थळावरती तालुक्यातील अनेक लोकांच्या जनावरांची व्यवस्था करण्यात आली आहे त्याची पाहणी केली. यावेळी बोलताना सदाभाऊंनी पूरग्रस्त लोकांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे असल्याचं विधान केले.

तसेच सदाभाऊ खोत यांनी स्थलांतरित झालेल्या नागरिकांची भेट घेऊन आपुलकीने चौकशी केली. तसेच त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाडगे यांनी तालुक्यातील नागरिकांची राहण्याची उत्तम सोय केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनीही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यात सचिन तेंडूलकर, अजिंक्य रहाणे, अक्षय कुमार, संतोष जुवेकर, सुबोध भावे, दिपाली सय्यद, रितेश देशमुख, उर्मिला मातोंडकर यांचा समावेश आहे.