माझा अन त्यांचा बांधाला-बांध आहे तरीही जयंत पाटलांविरोधात मीच लढणार – सदाभाऊ खोत

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभ निवडणुकीत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीने 13 जागांची मागणी केली आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण, कोरेगाव, कराड-उत्तर आणि फलटणचा समावेश असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर इस्लामपूरची जागा संघटनेला मिळाली तर आपण स्वतः लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात मीच निवडणूक लढणार आहे, असा चंगच सदाभाऊ यांनी बांधला आहे. ते सातारा येथे पत्रकारांशी बोलत होते.

माझी आणि जयंत पाटलांची शेती एकत्र आहे. त्यांच्या बांधाला माझे बांध आहेत. त्यामुळे त्यांच्याशी माझी अधूनमधून चर्चा होत असते. मात्र, मी त्यांच्याशी कदापी जुळवून घेणार नाही; कारण त्यांचा आणि माझा संघर्ष गेली तीस वर्षे सुरु आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तुम्ही ‘रयत क्रांती संघटने’साठी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ मागितला आहे. त्यामुळे तेथून इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील लढणार की तुम्ही स्वत: लढणार, असे विचारले असता जयंतरावांच्या विरोधात दुसरे तिसरे कोणी नसून मी स्वत:च उमेदवार आहे, असेही खोत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, माण-खटावमधून आ. जयकुमार गोरे यांच्यासाठी जागा मागितली आहे का? असे पत्रकारांनी विचारताच खोत म्हणाले, उमेदवरीबाबत कार्यकर्त्यांना विचारात घेवून निर्णय घेतला जाईल. मात्र, आ. गोरे यांनी दुष्काळी भागात पाण्यासाठी आमदारकी पणाला लावली. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर ही पाण्यासाठी संघर्ष केला. माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत त्यांनी निर्णायक भूमिका घेतल्यामुळे विजय मिळवता आला, असे खोत यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला दोनशेहून अधिक जागा मिळणार आहेत. त्यामुळे उर्वरित जागांसाठीच विरोधकांनी तयारी करावी, बाकीच्या दोनशे जागांचा नाद सोडून द्यावा, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.