…तर राजू शेट्टी विरोधात लोकसभा लढवणार – सदाभाऊ खोत

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, तर मी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे. कारण, हातकणंगलेमधील जनतेला आता बहुजन चेहरा हवा आहे. बहुजन समाजातीलच व्यक्तीला हातकणंगले मतदारसंघातील जनतेला खासदार करायचं आहे. अस वक्तव्य करून कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी विरोधात शड्डू ठोकला आहे. दौंड तालुका कृषी उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्था आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपा किसान मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय दौंड कृषी महोत्सव प्रदर्शनाला सदाभाऊंनी भेट दिली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

खोटं रक्त दाखवणं, पायाला फोड आलेले फोटो दाखवणं हे शेट्टींचं काम आहे, अशा शब्दात सदाभाऊ यांनी शेट्टींवर टीका केली.तर लोकसभेत प्रश्न मांडण्याऐवजी गल्लीत येऊन प्रश्न कायम असल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा प्रकार करतात. त्यांची ही कृती म्हणजे दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गजरा घालून हिंडायचा प्रकार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.