‘काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना ‘चोर’ असे म्हणणारे शेट्टी आता चोरांच्या टोळीचे भागीदार बनले आहेत’

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील वितुष्ट जगजाहीर आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आता हे दोन्ही नेते पुन्हा एकदा एकमेकांवर टीका करताना पहायला मिळत आहेत. भाजपचे लोकसभा उमेदवार खासदार संजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खोत सांगलीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना खोत यांनी शेट्टी यांच्यावर चांगलीच टीका केली.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना ‘आली बाबा चाळीस चोर’ असे म्हणणारे स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी आता चोरांच्या टोळीचे भागीदार बनले आहेत, अशी टीका खोत यांनी केली. वर्षानुवर्षे काटा मारणाऱ्या कारखानदारांविरोधात लढाई करणारे शेतकऱ्यांचे नेते मग, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पंगतीला बसून काटा मारण्याचा हिस्सा मागायला गेलेत का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

खोत म्हणाले, शेट्टींनी खासदार फंडातून वजन काटे उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. पाच वर्षाचा कालावधी संपला तरी वजन काटे बसवण्यात आले नाहीत. उसाचा काटा मारणाऱ्या विरोध लढाई करणारे शेट्टी आता कारखानदारांनी मारलेल्या काट्याचा हिस्सा मागायला गेले आहेत. हे आता हातकणंगले येथील जनतेलाही समजलेले आहे.