‘काहींना सध्या काम नसल्याने ते खड्ड्याचे छायाचित्र काढून ते सोशल मिडियावर टाकत आहेत’

sadabhau-khot-

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील रस्त्यांची दुर्दशा जनतेसमोर आणण्यासाठी खड्ड्यासोबत सेल्फी काढून सोशल मिडीयावर पोस्ट करावे असं आवाहन जनतेला केले आहे. मात्र काहींना सध्या काम नसल्याने ते खड्ड्याचे छायाचित्र काढून ते सोशल मिडियावर टाकत आहेत, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला आहे. ते सांगलीत बोलत होते.

नेमकं काय म्हणाले सदाभाऊ ?
‘केवळ सेल्फी काढून रस्ते होत नसतात. पंधरा वर्षात रस्ते चांगले झाले असते तर ते एका वर्षात उखडले नसते. सुरवातीपासूनच रस्ता दर्जाबाबत गाजत आहे. रस्ता लगेच खराब का झाला याची चौकशी व्हायला हवी. मात्र त्यावेळी झाली नाही. गेल्या पंधरा वर्षात रस्त्याला पैसे आले नाहीत तेवढा निधी नितिन गडकरी यांनी राज्यातील रस्त्याला उपलब्ध करून दिला. मुख्यमंत्री, महसूलमंत्री, आमदार सुधीर गाडगाीळ यांनी या रस्त्यासाठी प्रयत्न केले. काहींना सध्या काम नसल्याने ते खड्ड्याचे छायाचित्र काढून ते सोशल मिडियावर टाकत आहेत. असे सेल्फी काढून रस्ते होत असतील तर त्यांनी शाहुवाडीत , कोकणात जावे. त्यामुळे त्या भागातील रस्ते होतील. आमचे सरकार हे काम करणारे सरकार आहे’.