‘सेक्रेड गेम्स 2’ मुळे बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप अडचणीत

blank

टीम महाराष्ट्र देशा :- बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप अडचणीत येण्याची शक्यता आहे. सेक्रेड गेम्स 2 या वेब सिरीजमधील एका सीनमुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्याची तक्रार केल्यानंतर अनुरागविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेक्रेड गेम्स 2 मध्ये अभिनेता सैफ अली खान शीख पोलिसाच्या भूमिकेत आहे. एका सीन मध्ये तो स्वत:च्या हातातलं कडं काढून समुद्रात फेकताना दिसतो. या दृश्यावर आक्षेप घेत दिल्लीचे भाजप प्रवक्ते तेजिंदर बग्गा यांनी तक्रार नोंदवली होती. तर भाजप आमदार मनजिंदरसिंग सिरसा यांनीही सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला होता.

हातातील कडं ही शीख धर्मातील एक पवित्र आणि अविभाज्य भाग आहे. हे कडं अपार श्रद्धेने परिधान केलं जातं. ‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये दिग्दर्शकाने या कड्याचा आणि पर्यायाने शीख समुदायाचा अपमान केल्याचा आरोप बग्गा यांनी तक्रारीत केला आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी शीख समुदायाच्या भावना भडकवण्यासाठी आणि समाजातील धार्मिक गटांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक हा सीन टाकला, असाही दावा बग्गा यांनी केला आहे. या प्रकरणी अनुराग कश्यपविरोधात कलम 295 ए, 153 ए, 504, 505 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलीकडे अनुरागने जम्मू काश्मीरातील कलम 370 हटवण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. कलम 370 हटवण्याची पद्धत चुकीची आणि दहशत निर्माण करणारी असल्याचे त्याने म्हटले होते. यावरून तो प्रचंड ट्रोल झाला होता. मॉब लिचिंगविरूद्ध घेतलेल्या मोदीविरोधी भूमिकेमुळेही त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते.

त्यानंतर तो सातत्याने चर्चेत आहे. १० ऑगस्टला त्याने स्वत:चं स्वत:चं ट्विटर अकाऊंट डिलीट केलं होतं. आई-वडील आणि मुलीला सोशल मीडियावरुन सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचं सांगत त्याने अकाऊण्ट बंद केलं होतं.

महत्वाच्या बातम्या