मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देखील लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे.
एनआयए कोर्टासमोर वाझेचे हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील खंडणी मागण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे.SBUT वरील चौकशी थांबवण्यासाठी व बृहन्मुंबई महापालिकेच्या काही ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्यास सांगितल्याचे सचिन वाझे याने आपल्या पत्रात नमूद केलं आहे.यावरून राजकारण तापायला लागले आहे. भाजपकडून जोरदार टीका केली जात असून, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रानंतर अडचणीत आलेले अनिल परब यांनी उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी माझे दैवत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की, सचिन वाझे यांच्या पत्रातील आरोप खोटे आहेत, असे भावनिक स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, लेटरबॉम्बवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. “निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रातील मजकूर विचार करायला लावणारा आहे. पत्राची चौकशी होऊन ‘दूध का दूध पानी का पानी’ व्हावं” अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“महाराष्ट्रात जे घडतंय ते राज्याच्या आणि पोलिसांच्याही प्रतिमेसाठी चांगलं नाही. हायकोर्टाने सीबीआयला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. वाझेंच्या आरोपांचीही सीबीआय किंवा तत्सम तपास यंत्रणांकडून चौकशी करावी. “दूध का दूध पानी का पानी” व्हावं, सत्य बाहेर यावं, अन्यथा पोलिसांची डागाळलेली प्रतिमा कधीच सुधारणार नाही” असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘आपले अपयश झाकण्यासाठीच केंद्रिय आरोग्य मंत्र्यांनी पत्रक काढून उर बडवायला सुरवात केलीय’
- ‘चेन्नई सुपर किंग्स पहिल्या चारमध्ये स्थान मिळवू शकणार नाही’ ; तीन माजी क्रिकेटर्सचं विधान
- लसीकरणासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, धनंजय मुंडेंचे आवाहन
- फोर्ब्सच्या धनकुबेरांच्या यादीत सायरस पूनावाला प्रथमच पहिल्या दहात सामील
- संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध असताना पंढरपुरात अजितदादांच्या सभेला जमली तौबा गर्दी