कडेकोट बंदोबस्तात सचिन वाझेवर करण्यात आली ओपन हार्ट सर्जरी

vaze

मुंबई : द्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया टॉवरजवळ कारमध्ये ठेवण्यात आलेली स्फोटकं आणि याच कारचा मालक मनसुख हिरन याची ठाण्यात झालेली हत्या या प्रकरणात अटकेत असलेला आणि मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाझे यांच्यावर आज ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आहे.

कोर्टाच्या परवानगीनंतर वाझेवर मुंबई सेंट्रलमधील वोकहार्ट रुग्णालयात सर्जरी करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी वाझे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्याची माहिती कालच त्याच्या वकिलांनी दिली होती. जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी वाझेच्या हृदयावर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमवारी सचिन वाझे मुंबई सेंट्रलमधील वोकहार्ट रुग्णालयात दाखल झाला होता.

तर आज वाझेवर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. सचिन वाझेची प्रकृती स्थिर आहे. कार्डिअॅक सर्जन डॉ कमलेश जैन आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ अंकुर आणि डॉ केदार यांच्या टीमने वाझेवर शस्त्रक्रिया केली. यावेळी रुग्णालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करून ठेवण्यात आली असल्याचे पहायला मिळाले होते.

दरम्यान सचिन वाझेने अँटिलिया स्फोटक कार प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. एनआयएने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्तांचा जबाब आहे. ‘अँटिलिया कार प्रकरणात कोणताही दहशतवादी अँगल नाही, हिरेनचा मृत्यू ही आत्महत्याच आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत वाझेने पटवून सांगितलं होतं. याचा तपास आपल्याकडेच सोपवावा अशीही त्याने मागणी केली होती’, असे आयुक्तांच्या जबाबात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या