क्रिकेटचा ‘देव’ सचिन तेंडूलकरही धावला पूरग्रस्तांच्या मदतीला

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतीमालाची मोठी हानी झाली आहे. मोठ्या प्रमाणात पशुधनाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर क्रिकेटचा देव असणारा सचिन तेंडूलकर पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आला आहे. त्याने ट्वीट करून ‘देशभरात आलेल्या महापुराने विनाश ओढावला आहे. पाणीपातळी कमी होत असताना पूरग्रस्त राज्यांना मदतीची आवश्यकता आहे. मी ‘पंतप्रधान मदत निधी (https://pmnrf.gov.in/en/) च्या माध्यमातून मदत केली आहे. तुम्हा सर्वांना मदत आणि सहकार्य करण्याचं आवाहन करतो’अशी माहिती दिली आहे.

तसेच यापूर्वी मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य राहणेही पुर्ग्रास्तान्च्ता मदतीला धावला होता. त्याने आपल्याला माहित असेलच, महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा अस आवाहन केले होते.

दरम्यान, राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे. हा निधी मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे या बाधित नागरिकांना सरकारच्या आर्थिक मदतीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे.