गोंधळी विरोधकांपुढे ‘क्रिकेटचा देव’ हतबल

sachin-TENdulkar in parliament

नवी दिल्ली: खासदार सचिन तेंडुलकरची राज्यसभेत आज पुरती दमछाक झाली. सचिन आज राज्यसभेत ‘राईट टू प्ले’ या महत्वाच्या विषयावर बोलणार होता.सचिन तेंडुलकर आज पहिल्यांदा राज्यसभेत बोलण्यासाठी उभा राहीला होता. मात्र विरोधकांच्या गोंधळामुळे सचिनला काहीच बोलता आलं नाही.

 भारतरत्न आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे आज पहिल्यांदाच राज्यसभेत भाषण होते. तो काय बोलणार, कोणता मुद्दा मांडणार याबाबत सदस्य आणि त्याच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता होती.मात्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरील आरोपांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले होते.गोंधळादरम्यान राज्यसभेचे अध्यक्ष व्यकंय्या नायडू विरोधकांना गोंधळ करू नका असं वारंवार सांगत होते.सचिन खेळांविषयी महत्वाच्या विषयावर बोलणार असून विरोधकांना शांत राहण्याची ते विनंती करत होते. सचिन भारतरत्न असून संपूर्ण देश भाषण ऐकत आहे, त्यामुळे शांत राहावे, असे ते वारंवार सांगत होते. पण विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सचिनला भाषण करण्याची प्रचंड इच्छा होती. सगळेच शांत होतील, असे त्याला वाटत होते. तो बराच काळ जागेवरच उभा होता. त्याने वाटही पाहिली. पण विरोधकांचा गदारोळ सुरुच राहिला. अखेर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यामुळे सचिनचे भाषण ऐकण्याची संधी हुकली.