क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ, स्मिथ-वॉर्नरवरील बंदीचा निर्णय योग्य- सचिन

Sachin

टीम महाराष्ट्र देशा- चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात दोषी आढळलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर या दोघांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं घातलेली बंदी योग्यच आहे, असं ठाम मत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं व्यक्त केलं आहे.

या संपू्र्ण प्रकरणावर सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखला जातो. हा एक असा खेळ आहे की, जो पारदर्शक पद्धतीने खेळला गेला पाहिजे असं माझं मत आहे. जे काही झालं ते अत्यंत चुकीचं झालं. पण याप्रकरणी जो निर्णय घेण्यात आला आहे तो अतिशय योग्य आहे. विजय हा महत्त्वाचाच असतो. पण तो तुम्ही कशा पद्धतीने मिळवता हे अतिशय महत्त्वाचं असतं.’ असं ट्वीट सचिननं केलं आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी बॉल टॅम्परिंग प्रकरणात डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथवर १२ महिन्यांसाठी बंदी घातली आहे. ही कारवाई अत्यंत कठोर असल्याचे मत व्यक्त होत आहे. वॉर्नर आणि स्मिथला दुसऱ्यांदा संधी द्यावी, अशी विनंती ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी केली आहे. स्मिथ आणि वॉर्नरलाही नेमकी कोणती शिक्षा व्हायला हवी होती, याचा मी अजून विचार करतो. पण एका वर्षाची शिक्षा ही खूप कठोर आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नने व्यक्त केले आहे.