fbpx

सचिन तेंडूलकर पवारांच्या भेटीला; सचिनची राजकारणात होणार का एन्ट्री?

टीम महाराष्ट्र देशा – सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे हे सगळीकडेच वाहत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर अनेक सिनेकलाकर राजकारणात प्रवेश करत आहेत. नुकताच उर्मिला मातोंडकरनेही कॉंग्रेसचा हात पकडत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेकलाकारांसोबातच हे निवडणुकीचे वारे क्रिकेटर्स मध्येही पसरत आहे. भारतीय टीमचा धडाकेबाज माजी सलामीवीर गौतम गंभीरने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

आता याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर यानेही राजकारणात फटाकेबाजी करण्याचा निर्णय घेतलाय की काय असा प्रश्न उपस्थित झालाय. हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण असे कि, सचिन तेंडूलकर आज राजकारणातले देव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटी मागचे नक्की कारण काय असू शकते या चर्चेला सध्या उधाण येत आहे.

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक येथील निवासस्थानी या दोन दिग्गजांची भेट झाली. ही भेट नियोजित होती, तसेच ही भेट जवळपास अर्धा तास चालू होती. सकाळी १०.४५ ते ११.१५ पर्यंत हि गुप्त चर्चा चालू होती. सचिन आणि शरद पवार यांच्या भेटीमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. सध्या निवडणुकीच्या तोंडावर सचिनने घेतलेल्या या भेटीचा अनेक जण राजकीय अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. खासगी कारणांसाठी ही भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे.