भाजपाचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ; काँग्रेसचा प्रहार

मुंबई : सीरम इस्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच, ‘आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून मला या धमक्या येत आहेत. आणि यामुळे ते कोरोना लशीचे उत्पादन लंडन मध्ये करण्याच्या तयारीत आहेत.’

पुनावाला यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रासह देशभरात खळबळ उडाली असून राज्याच्या राजकीय नेत्यांमध्ये देखील आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी रंगल्या आहेत. भाजप नेते हे अदार पुनावाला यांच्यावर महाविकास आघाडीतील नेतेच दबाव निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप करत आहेत.

आता, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. ‘भाजपाचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ अशी परिस्थिती आहे. जो यांना आरसा दाखवतो त्याच्यावर गलिच्छ भाषेत टिका केली जाते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी, मनमोहन सिंहजी व राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या चुका दाखवण्याचा, सल्ला देण्याचा प्रयत्न केला त्यावर लगेच मोदी सरकारच्या मंत्र्यांनी मुजोरपणे टिका केली. काँग्रेस नेत्यांचा सल्ला वेळीच ऐकला असता तर देश आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झाला नसता, लाखो संसार उघड्यावर पडले नसते, अनेकांना प्रियजनांना मुकावे लागले नसते, निष्पाप बळी गेले नसते, स्मशानात रांगा लागल्या नसत्या. देशाची नाचक्की झाली नसती.’ असा प्रहार सचिन सावंत यांनी केला आहे.

पुढे त्यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांना देखील लक्ष्य केलं. ‘हि केवळ भाजपा ची मुजोरी, अकार्यक्षमता व अज्ञान जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालयाने हेच प्रश्न विचारले असतानाही आशिष शेलार यांनी भाजपा ची मुजोरपणा ची परंपरा कायम राखली. भाजपा हा टवाळखोरांचा पक्ष आहे हे स्पष्ट आहेच. भाजपा नेत्यांनी कितीही टवाळखोरी केली तरी काँग्रेस जनतेचा आवाज उचलत राहील. नाना पटोले यांनी अदार पुनावाला यांच्या तक्रारीवरून सवाल केला. लसीकरणाबाबत मोदी सरकारच्या नियोजनशून्यतेवर बोट ठेवले. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना केंद्राने रेमडेसिवीर व लसींची निर्यात का केली हा प्रश्न उपस्थित केला.’ असं सविस्तर भाष्य सचिन सावंत यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या