‘काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधायला सरकारकडे पैसे, पण गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी नाही’

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील गढ किल्यांवर खासगी विकसकांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळाडून ३ सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. त्यामुळे आता एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकते. यावर अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.

जे गडकिल्ले सरकारने विकण्यास काढले आहेत त्यात साल्हेरचा किल्ला आहे. शिवरायांच्या आणि मराठयांच्या पराक्रमाचे सोनेरी पान म्हणजे साल्हेर. काश्मीरमध्ये रिसाॅर्ट बांधायला या सरकारकडे पैसे आहेत पण महाराष्ट्राच्या अस्मितेचे संरक्षण करण्यासाठी नाहीत हे दुर्दैव आहे. जाहीर निषेध!, असे ट्विट करत सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

दरम्यान ज्या गडकिल्ल्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास जगासमोर उभा राहतो, त्याचा अशा प्रकारे वापर करून पैसे कमावण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. आधी राजकारणासाठी तर आत्ता पैसे कमवण्यासाठी महाराजांचा वापर करणाऱ्या या सरकारचा मी ठामपणे विरोध करतो, असे ट्विट करत अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले आहे.