रत्नागिरीच्या पुलोत्सवात सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी यांचा सन्मान

khedekar joshi

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसांच्या दहाव्या पुलोत्सवात प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांना पुलोत्सव सन्मान, तर जितेंद्र जोशी यांना पुलोत्सव तरुणाई पुरस्कार दिला जाणार आहे. रत्नागिरीत मतिमंदांसाठी कार्य करणाऱ्या आविष्कार शाळेला यावर्षीचा पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्यात येणार आहे.

रत्नागिरीतील दहावा पुलोत्सव येत्या त्रिपुरारी पौर्णिमेला सुरू होणार आहे. महोत्सवात सचिन खेडेकर यांना पुलोत्सव सन्मान दिला जाणार आहे. नाट्यक्षेत्रापासून सुरू झालेला अभिनयाचा त्यांचा प्रवास हिंदी, मराठी दूरदर्शन मालिकांनंतर चित्रपटक्षेत्रात विसावला आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, नेताजी, मुरांबा, बापजन्म यांसारख्या अनेक चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. हिंदी मालिकांमध्ये सैलाब मधली त्यांची भूमिका खूप गाजली. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. श्री. खेडेकर यांच्या अभिनय क्षेत्रातल्या प्रदीर्घ कारकिर्दीचा मानवंदना म्हणून त्यांना रविवारी (दि. ५ नोव्हेंबर) पुलोत्सव सन्मान दिला जाणार आहे.

पुलोत्सव तरुणाई पुरस्कार जितेंद्र जोशी यांना दिला जाणार आहे. अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्त्व असलेल्या जितेंद्रने अनेक मराठी चित्रपटांमधून आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे. नाट्यसृष्टीतल त्याच अस्तित्व एकदम खास ठरले आहे. स्वतः उत्कृष्ट कवी असलेला जितेंद्र अत्यंत संवेदनशील विषयांवर एकदम तरल भाष्य करतो. त्याची साहित्यिक जाण जितकी चांगली आहे, तितकीच त्याची सामाजिक जाणीवही चांगली आहे. आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रमांना त्याने सर्वतोपरी सहकार्य केले आहे.

तिसरा महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार! दशकपूर्ती पुलोत्सवाच्या निमित्ताने हा पुरस्कार रत्नागिरीच्या आविष्कार या मतिमंदांसाठी कार्यरत संस्थेला देण्यात येणार आहे. गेली सुमारे ३० वर्षे आविष्कार संस्था कोकणात दिव्यांगांसाठी काम करत आहे. संस्था अत्यंत सचोटीने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने कार्यरत असून संस्थेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संस्थेकडे असलेला उच्चशिक्षित कर्मचारी वर्ग हे संस्थेचे मोठे भांडवल असून त्यांच्याच जिवावर संस्थेला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या संस्थेचा गौरव पुलोत्सवाच्या पहिल्या दिवशी ३ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल.