ओवेसी यांच्याशी ‘निकाह’झाल्याने प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रविरोधी झटके येऊ शकतात : शिवसेना

टीम महाराष्ट्र देशा- सध्या प्रकाश आंबेडकरांचा ‘निकाह’ एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्याशी झाला असून त्यामुळे त्यांना राष्ट्रविरोधी झटके येऊ शकतात. पण प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे समाजाचे मालक नाहीत. या देशात वंदे मातरम् म्हणावेच लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी ‘वंदे मातरम्’ला विरोध दर्शवला होता. देशाचे राष्ट्रगीत असताना ‘वंदे मातरम्’ची सक्ती कशासाठी असा सवाल त्यांनी विचारला होता. बुधवारी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकेची झोड उठवली.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या आजच्या अग्रलेखात ?
‘वंदे मातरम्’ म्हणणे हे इस्लामविरोधी आहे असे ओवेसी यांचे म्हणणे आहे. ओवेसी यांच्या मागण्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने आंधळय़ासारखा पाठिंबा द्यावा हे क्लेशदायक आहे. पण प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे समाजाचे मालक नाहीत. ‘वंदे मातरम्’ म्हणजे मातृभूमीला वंदन करणारे लाखो मुसलमान ओवेसींचे राजकारण ठोकरून लावतील त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू काय करणार? अर्थात, ‘वंदे मातरम्’ला आंधळा विरोध करणाऱ्यांच्या डोक्यात हा ‘प्रकाश’ पडेल का हा प्रश्नच आहे. या देशात वंदे मातरम् म्हणावेच लागेल!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी ‘वंदे मातरम्’ला विरोध केला आहे. प्रकाश आंबेडकरांचा ‘निकाह’ सध्या एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्याबरोबर लागला आहे. त्यामुळे त्यांना असे राष्ट्रविरोधी झटके येऊ शकतात. ओवेसी हे मुस्लिम लीगचे नवे अवतारपुरुष आहेत. हिंदुस्थानच्या फाळणीची मुहूर्तमेढ मुस्लिम लीगनेच रोवली होती व त्यासाठी त्यांनी बहुसंख्य हिंदूंना अमान्य होतील अशा अनेक कुरापती काढल्या होत्या. मुसलमानांना भडकवण्याचे, त्यांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहापासून तोडण्याचे काम पाकिस्तानचे मूळपुरुष बॅ. जीना यांनी केले. अशा जीनांचा आत्मा अधूनमधून येथील मुसलमान पुढाऱ्यांत घुसत असतो. कधी तो शहाबुद्दीन तर कधी तो मुलायमसिंगांत घुसतो. सध्या तो मियाँ ओवेसी यांच्या शेरवानीत घुसला आहे, पण त्यांच्या शेरवानीच्या नाडीत प्रकाश आंबेडकर यांची मान अडकली असल्याने तेदेखील मुस्लिम लीगचीच भाषा बोलत आहेत. प्रकाश आंबेडकर असे म्हणाले की, ‘‘देशात राष्ट्रगीत गायले जात असताना ‘वंदे मातरम्’ कशाला हवे? काहीतरी एकच म्हणा ना! ‘जन गण मन’ आम्ही म्हणू, ‘वंदे मातरम्’ला आमचा विरोधच असेल.’’ प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे आमचा विरोध म्हणजे नक्की कुणाचा? ‘वंदे मातरम्’ला ओवेसी ‘उरुस’ मंडळाचा विरोध समजण्यासारखा आहे, पण त्यांच्या विरोधाला न जुमानता

देशातील मुसलमान

‘वंदे मातरम्’चे गान करीत आहेत. ‘वंदे मातरम्’ गायचे की नाही याची परवानगी मागायला कुणी हैदराबादेत जायची गरज नाही किंवा प्रकाश आंबेडकर यांच्याकडेही कुणी अर्जविनंत्या केलेल्या नाहीत. ‘वंदे मातरम्’चा गजर करीत शेकडो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या वेदीवर हौतात्म्य पत्करले व त्यात अशफाकउल्ला खाँसारख्या मुसलमान क्रांतिकारकांचाही समावेश आहे. ‘वंदे मातरम्’ म्हणजे मातृभूमीला वंदन. तसे करण्यासाठी येथील मुसलमानांना ओवेसी किंवा प्रकाश आंबेडकर यांना विचारण्याची आवश्यकता नाही. प्रकाश आंबेडकर यांचे आजवरचे एकूण राजकारण पाहता ते थोडेबहुत बिघडण्याची लक्षणे दिसत होतीच, पण आता त्यांची अवस्था ‘ढेकणासंगे हिरा भंगला’ अशी झाली आहे. ओवेसी यांच्या नादाने प्रकाश आंबेडकरांनी स्वतःचे जे अधःपतन करून घेतले आहे ते पाहता आंबेडकरी समाज त्यांना माफ करणार नाही. बाबासाहेबांना जे कधीच मान्य झाले नसते असे ‘जीना छाप’ राजकारण प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केले आहे. ओवेसी यांचे राजकारण राष्ट्रीय एकात्मतेचे नाही. ते स्वतःला देशभक्त वगैरे मानतात, पण येथील मुसलमानांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ देत नाहीत. ‘‘मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहे व जोपर्यंत पाकिस्तानातील प्रत्येक हिंदूला येथे आणत नाही व प्रत्येक मुसलमानाला तिथे पाठवत नाही तोपर्यंत या फाळणीस अर्थ नाही. येथे राहिलेला मुसलमान काही वर्षांनी पुन्हा

नव्या पाकिस्तानची मागणी

करीत राहील’’ असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. ते आता सत्य वाटत आहे. बॅ. जीना व डॉ. आंबेडकर यांचा मेळ कधीच बसला नाही, पण प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांची ‘कैची’ बसली आहे. ओवेसी यांनी राममंदिरास विरोध केला आहे. त्यांना समान नागरी कायदा नको आहे. त्यांना कश्मीरातील 370 कलम हटवलेले नको आहे. ‘वंदे मातरम्’ म्हणणे हे पाप व इस्लामविरोधी आहे असे ओवेसी यांचे म्हणणे आहे. ओवेसी यांच्या मागण्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने आंधळय़ासारखा पाठिंबा द्यावा हे क्लेशदायक आहे. हाच त्यांचा निधर्मीपणा असेल तर त्यांची भूमिका संविधानद्रोही म्हणजेच बाबासाहेबांच्याच विरोधात आहे. ओवेसी हे एकधर्मीय राजकारण करून स्वतःची पोळी भाजत आहेत, पण प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा समाज ओवेसी यांच्या दावणीला का बांधावा ते कळत नाही. भारतीय जनता पक्षाला मदत व्हावी म्हणून ओवेसी – प्रकाश आंबेडकरांचे मेतकूट जमले आहे हे सांगायला भविष्यवाल्याची गरज नाही, पण प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे समाजाचे मालक नाहीत. ‘वंदे मातरम्’ म्हणजे मातृभूमीला वंदन करणारे लाखो मुसलमान ओवेसींचे राजकारण ठोकरून लावतील त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू काय करणार? अर्थात, ‘वंदे मातरम्’ला आंधळा विरोध करणाऱ्यांच्या डोक्यात हा ‘प्रकाश’ पडेल का हा तसा प्रश्नच आहे. या देशात वंदे मातरम् म्हणावेच लागेल!

शरद पवारांना प्रतिगामी मानत नाहीत- प्रकाश आंबेडकर

पाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का?,शरद पवारांनी आंबेडकरांना झापले