किती दहशतवादी मारले गेले हा आकडा जाणून घेणे जनतेचा अधिकार – शिवसेना

टीम महाराष्ट्र देशा : बालाकोट येथे करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकवर विरोधी पक्षाकडून काही प्रश्न उपस्थित केले जात आहे तर आता भाजपच्या मित्रपक्षानी देखील बालाकोट येथे करण्यात आलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले याचा आकडा जाणून घेणे हा अधिकार असल्याच म्हंटल आहे. शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून म्हणजेच सामना मधून अग्रलेला द्वारे हे वक्तव्य केले आहे.

वाचा काय आहे ‘सामना’चा अग्रलेख ?

दहशतवादी तळांवर आपण केलेल्या हवाई हल्ल्यात नेमके किती अतिरेकी मेले, या प्रश्नांचा चोथा चघळणे मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरूच राहील. पुलवामा हल्ल्यापर्यंत विरोधकांसाठी महागाई, बेरोजगारी, राफेल घोटाळा हे जे ज्वलंत विषय होते त्यावरच मोदी सरकारचा ‘बॉम्ब’ पडला. या विषयांचे तळ उद्ध्वस्त झाले व पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. राममंदिर, 370 कलम, शेतकर्यांचे प्रश्न वगैरे खाक झाले. जनता युद्धज्वरात धुंद आहे. त्यामुळे विरोधक ‘बुंद’ झाले आहेत. फक्त एक हवाई हल्ला केल्यावर हे धुंद वातावरण, मग पाकव्याप्त कश्मीरचा ताबा जेव्हा मोदी घेतील तेव्हा काय वातावरण असेल याची कल्पना न केलेलीच बरी!

विरोधकांकडून सैन्याच्या खच्चीकरणाचा प्रयत्न होत असल्याची खंत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे. आपले पंतप्रधान हे अत्यंत संवेदनशील आहेत. एखाद्या विषयावर ते भावूक होतात व त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येते, पण या वेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आले नाही. हिंदुस्थानी सैन्याने पाकड्यांना पाणी पाजल्याचा आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता. जेव्हापासून युद्धाचा माहोल सुरू झाला तेव्हापासून पंतप्रधान मोदी उसंत न घेता जाहीर सभांतून विरोधकांवर तोफा डागत आहेत.

भाजपचे मेळावे, नितीश कुमार यांच्याबरोबरच्या सभांतून ते पाकिस्तानवर गरजत आहेत. विरोधकांचे म्हणणे असे आहे की, संपूर्ण देश सैन्याच्या मागे ठामपणे उभा आहे. सैन्याच्या शौर्याला सलाम, पण पुलवामा हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हिंदुस्थानी हवाई दलाने हल्ला केला व ते तळ उद्ध्वस्त केले. 350 च्या आसपास दहशतवादी त्यात मारले गेले व पाकड्यांचे कंबरडे मोडले असे जर सांगितले जात असेल तर त्याचे काही पुरावे वगैरे आहेत काय ? म्हणजे समजा, हे जे लोक खतम झाले त्यांच्या मृतदेहांचे फोटो वगैरे देशाला दाखवले तर बरे होईल, असे विरोधकांनी म्हटले आहे. यावर पंतप्रधान भडकले. सैन्याच्या खच्चीकरणाचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांचा दावा आहे की, मी दहशतवाद संपवायच्या मागे आहे आणि विरोधक मला संपवायला निघाले आहेत. हिंदुस्थानी मीडियाने काही गोष्टी मसाला भरून सांगितल्या. पाकबरोबरचे युद्ध जणू सैन्य लढत नव्हते तर इलेक्ट्रॉनिक मीडिया लढत होता.

हवाई दलाची जी विमाने पाकिस्तानात घुसली त्यातही इलेक्ट्रॉनिक मीडियाचेच शूरवीर होते व त्या विमानांतून या मंडळींनी युद्ध रिपोर्टिंग केले असेच चित्र दिसत होते. युद्धकाळात कसे वागू नये याचा धडा आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने घालून दिला. हिंदुस्थान-पाकिस्तानात जेवढी चढाओढ किंवा दुश्मनी नसेल त्यापेक्षा ‘तेज’ किंवा ‘सबसे तेज’ चढाओढ वृत्त वाहिन्यांत आहे. पण निदान युद्धाच्या वेळी तरी तारतम्य बाळगावे याचे भानही त्यांना नव्हते. जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांवर हल्ले झाले व त्यात 350 अतिरेक्यांचा खात्मा झाला असे सरकार किंवा सैन्यातर्फे अधिकृतपणे सांगण्यात आले नव्हते.

केंद्रातले एक मंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी प. बंगालात हाच मुद्दा उपस्थित केला. 350 अतिरेकी मारले गेल्याचे पंतप्रधान मोदी यांनी कधीच सांगितले नाही. मग त्यांच्यावर विरोधक का तुटून पडत आहेत? हा मुद्दा बिनतोड आहे. ज्याअर्थी हवाई हल्ल्याची कबुली पाक पंतप्रधानांनी दिली व ‘एफ-16’ विमान पाडताना विंग कमांडर अभिनंदन पाक हद्दीत घुसला व शौर्य गाजवले, हा एक पुरावाच आहे. या शौर्याचे कौतुक सगळ्यांनीच केले, पण विरोधकांचा टीकाग्नी शांत होत नाही. ममता बॅनर्जी, ओवेसी, प्रकाश आंबेडकर, शरद पवार, मायावती, अखिलेश यादव अशा नेहमीच्याच यशस्वी कलाकारांनी शंका उपस्थित केल्या आहेत. पुलवामात हल्ला झाला तेथे 300 किलो आरडीएक्स आले कुठून? दहशतवादी तळांवर आपण केलेल्या हवाई हल्ल्यात नेमके किती अतिरेकी मेले, या प्रश्नांचा चोथा चघळणे मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरूच राहील. कारण पुलवामा हल्ल्यापर्यंत विरोधकांसाठी महागाई, बेरोजगारी, राफेल घोटाळा हे जे ज्वलंत विषय होते त्यावरच मोदी सरकारचा ‘बॉम्ब’ पडला.

या विषयांचे तळ उद्ध्वस्त झाले व पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. राममंदिर, 370 कलम, शेतकर्यांचे प्रश्न वगैरे खाक झाले. पाकिस्तानवरील हवाई हल्ला व सैनिकांचे शौर्य यामुळे आज तरी देशाची जनता ‘धुंद’ झाली आहे. मात्र विरोधकांची उतरली आहे हे सत्य आहे. किती अतिरेकी नक्की मेले? हा प्रश्न फक्त मोदी यांचे राजकीय विरोधकच विचारीत नाहीत. इंग्लंड, अमेरिका वगैरे राष्ट्रांतील मीडियानेही नेमके तेच प्रश्न उपस्थित केले. सैन्य दलाची कारवाई झालीच आहे, पण दुश्मनांचे नक्की किती व कोणते नुकसान झाले हे जाणून घेण्याचा अधिकार देशाच्या नागरिकांना आहेच व त्यामुळे सैन्याचे खच्चीकरण केले जात आहे असे आम्हाला वाटत नाही. आमचे सैन्य समर्थ व मनाने मजबूत आहे. विरोधकांच्या भुंकण्याने समर्थ सैन्याचा हत्ती विचलित होणार नाही. पंतप्रधानांची चिंता व खंत आम्ही समजू शकतो. त्यांची संवेदनशीलता टोकाची आहे.

गेल्या पन्नास-साठ वर्षांत काँग्रेसने पाकिस्तानला धडा शिकवला नाही व पंतप्रधान मोदी यांनी पाकड्यांना ‘चुन चुन के मारले’ आहे (हा त्यांचाच शब्द आहे). त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचे मनोबल सैन्याइतकेच धडाकेबाज आहे. विरोधकांनी भिंतीवर डोके आपटून घेऊ नये. हवाई हल्ल्यात किती अतिरेकी मारले? असे प्रश्न निरर्थक आहेत. कितीजण ठार झाले ते मोजण्याचे काम हवाई दल करत नाही. हवाई दल फक्त ‘लक्ष्या’वर हल्ला करते, हे हवाई दल प्रमुखांनीच आता स्पष्ट केले. ते काही असले तरी जनता युद्धज्वरात धुंद आहे. त्यामुळे विरोधक ‘बुंद’ झाले आहेत. फक्त एक हवाई हल्ला केल्यावर हे धुंद वातावरण, मग पाकव्याप्त कश्मीरचा ताबा जेव्हा मोदी घेतील तेव्हा काय वातावरण असेल याची कल्पना न केलेलीच बरी!