देशाची सुरक्षा रोज रक्ताने न्हाऊन निघत असताना आमचे सरकार शिरकुर्म्याच्या ढेकरा देत आहे

टीम महाराष्ट्र देशा : देशाची सुरक्षा कश्मीर खोऱयात रोज रक्ताने न्हाऊन निघत आहे. रमजानचे रोजे पाळणारे आमचे सरकार शिरकुर्म्याच्या ढेकरा देत जणू आडास तंगडय़ा लावून बसले आहे. असा घणाघाती टोला शिवसेनेने आपल्या मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकातून लगावला आहे.

काय आहे आजचा सामना संपादकीय

देशाची सुरक्षा कश्मीर खोऱयात रोज रक्ताने न्हाऊन निघत आहे. रमजानचे रोजे पाळणारे आमचे सरकार शिरकुर्म्याच्या ढेकरा देत जणू आडास तंगडय़ा लावून बसले आहे. रमजान म्हणून आम्ही कश्मीरात एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केली. ती आमच्या सुरक्षा दलांना कसोशीने पाळायला लावली. मात्र त्याचा गैरफायदा घेत पाकपुरस्कृत दहशतवाद्यांचा कश्मीरात नंगानाच सुरू आहे. त्याशिवाय तेथील हिंदुस्थान प्रेमाचा प्रत्येक आवाज बंद केला जात आहे. अशावेळी तुमचे आंतरराष्ट्रीय दौरे व राजकारण कुचकामी ठरते.

सध्या तेच सुरू आहे. हिंदुस्थान नामक देशातील अंतर्गत सुरक्षा म्हणजे एक खेळखंडोबाच झाला आहे. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर उभे राहिलेले नाही. राम आजही वनवासात आहे, पण देशाची सुरक्षा मात्र ‘रामभरोसे’ पद्धतीने सुरू आहे. रमजानच्या महिन्यात कश्मीरात जो हिंसाचार, रक्तपात, हत्यासत्र अतिरेक्यांनी सुरू केले आहे त्याचे पाप सरकारच्या माथी मारावेच लागेल. आमच्या प्रिय मोदी सरकारने रमजानचे पावित्र्य वगैरे जपण्यासाठी कश्मीरात एकतर्फी युद्धबंदी जारी केली. पण त्याच वेळी सीमेपलीकडून व आतही पाकपुरस्कृत अतिरेक्यांचा रक्तपात थांबलेला नाही.

म्हणजे रमजानचे पावित्र्य आम्ही जपायचे व पाकडय़ांनी मात्र आमच्या रक्ताने रमजानची इफ्तारी करायची, अशी भयंकर स्थिती सध्या कश्मीरमध्ये दिसत आहे. रमजान सुरू झाल्यापासून आजपर्यंत कश्मीरात १८ जवान शहीद झाले. त्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी आमचा जाँबाज जवान औरंगजेबास पळवून नेले व त्याची निर्घृण हत्या केली. त्याशिवाय ‘रायझिंग कश्मीर’ या दैनिकाचे संपादक सुजात बुखारी यांचीदेखील हत्या केली. बुखारी हे सतत अतिरेक्यांच्या विरोधात व पाकिस्तानचा मुखवटा फाडणारे लिखाण करीत होते.
म्हणजे एका अर्थाने ते कश्मीरात ‘सामना’चीच भूमिका बजावीत होते.

अशा या राष्ट्रभक्त बुखारींचे रक्षण आमचे सरकार करू शकले नाही. हिंदुस्थानच्या बाजूने उठणारा प्रत्येक आवाज कायमचा बंद करण्यासाठी अतिरेक्यांच्या बंदुका धडधडत असताना आम्ही मात्र रमजानचे पावित्र्य जपत आहोत व सैनिकांचे तसेच सीमा सुरक्षा बलाचे मनोधैर्य खच्ची करीत आहोत. हे काही मर्दानगीचे लक्षण नाही. गेल्या चारेक महिन्यांत दोनशेच्या वर हत्या कश्मीरात झाल्या व त्यात आमच्या जवानांची संख्या जास्त आहे. पंतप्रधान परदेशवारीवर असतात व संरक्षणमंत्री पक्षकार्यात अडकून पडल्या. गृहमंत्री आहेत आणि नाहीत. पंतप्रधानांनी सतत परदेश दौरे करून हिंदुस्थानची मान जगात उंचावली आहे असे सांगितले जाते, पण ही मान मोडण्याचे काम संयुक्त राष्ट्राने केले.

कश्मीरात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा फालतू अहवाल ‘युनो’ने प्रसिद्ध करून श्री. मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेचे लचके तोडले आहेत. याचा अर्थ असा की, असंख्य जागतिक वाऱया केल्यानंतरही कश्मीरप्रश्नी हिंदुस्थानच्या पाठीशी उभे राहायला कोणी तयार नाही व ‘युनो’त आमची बाजू नीट मांडली जात नाही.

कश्मीर प्रश्नाचा चुथडा जितका नेहरूंनी किंवा काँग्रेसने केला नसेल तितका सध्याच्या राज्यकर्त्यांनी केला आहे. काँगेसवाल्यांनी चरारे शरीफ दर्ग्यात लष्कराकडून अतिरेक्यांना बिर्याणीची ताटे पोहोचवली असे आम्हीच झांजा वाजवून सांगत होतो. आज आम्ही रमजानच्या महिन्यातील रोझे पाळून जवानांना अतिरेक्यांच्या खाटीकखान्यात कुर्बानीचे बकरे म्हणून पाठवीत आहोत. हे भयंकर आहे. पंतप्रधान मोदींच्या घरावर एक उडती तबकडी (आकाशात घिरटय़ा घालताना) दिसली म्हणून पंतप्रधानांच्या सुरक्षेची व्यवस्था सुरक्षा यंत्रणांनी ‘टाईट’ केली. आकाश झाकून किंवा आकाशाच्या खाली बुलेटप्रूफ कवच निर्माण करून सुरक्षेची चोख काळजी घेतली जाईल. नव्हे, पंतप्रधान म्हणून ती घ्यावीच लागेल.

पण देशाची सुरक्षा कश्मीर खोऱयात रोज रक्ताने न्हाऊन निघत आहे. रमजानचे रोजे पाळणारे आमचे सरकार शिरकुर्म्याच्या ढेकरा देत जणू आडास तंगडय़ा लावून बसले आहे. रमजान म्हणून आम्ही कश्मीरात एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केली. ती आमच्या सुरक्षा दलांना कसोशीने पाळायला लावली.

मात्र त्याचा गैरफायदा घेत पाकपुरस्कृत दहशतवाद्यांचा कश्मीरात नंगानाच सुरू आहे. त्याशिवाय तेथील हिंदुस्थान प्रेमाचा प्रत्येक आवाज बंद केला जात आहे. अशावेळी तुमचे आंतरराष्ट्रीय दौरे व राजकारण कुचकामी ठरते. सध्या तेच सुरू आहे.