…तर संरक्षक जाळय़ाही त्यास मंत्रालयात घुसण्यापासून रोखू शकणार नाहीत

टीम महाराष्ट्र देशा: कोलमडलेला शेतकरी मनाने विकलांग झाला असून त्याचे मन अस्थिर झाले तर नायलॉनच्या संरक्षक जाळ्याही त्यास मंत्रालयात घुसण्यापासून रोखू शकणार नाहीत. सरकारच्या उपाययोजना कुचकामी असून आजार पोटाला व प्लॅस्टर पायाला बांधण्याचा हा प्रकार असल्याची खरमरीत टीका सामनामधून शिवसेनेने सरकारवर केली आहे.

काय आहे आजचा सामना संपादकीय ?

मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत गारपिटीमुळे सवा लाख हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशीम, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशीव, हिंगोली, जळगाव हे जिल्हेही गारपिटीने साफ कोलमडले आहेत. आता नुकसानीचे पंचनामे होतील. मदतीच्या घोषणा होतील, पण कोलमडलेला शेतकरी मनाने विकलांग झाला आहे. त्याचे मन अस्थिर झाले तर नायलॉनच्या संरक्षक जाळय़ाही त्यास मंत्रालयात घुसण्यापासून रोखू शकणार नाहीत. सरकारच्या उपाययोजना कुचकामी आहेत. आजार पोटाला आहे व प्लॅस्टर पायाला बांधले जात आहे.महाराष्ट्राचे मंत्रालय हे ‘सुसाईड पॉइंट’ बनल्यापासून सरकारचेही मन अस्थिर झाल्यासारखे दिसत आहे.

धर्मा पाटील (८४) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यापासून मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताकडे संशयाने पाहिले जात आहे. प्रत्येकजण हा जणू आत्महत्या करण्यासाठीच मंत्रालयात घुसत आहे, असे मंत्र्यांना वाटत आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी ते जालीम उपाययोजना करतील, शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न कायमचे सुटतील व अन्यायाचे ओझे घेऊन या मंडळीना मंत्रालयाच्या पायऱ्या चढण्याची गरज पडणार नाही असा बदल सरकारच्या कामकाजात होईल असे वाटले होते. पण झाले असे की, मंत्रालयात वारंवार होणाऱ्या आत्महत्या आणि आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयात नायलॉनच्या संरक्षक जाळय़ा बसविण्याचे काम सुरू झाले आहे. दुसऱ्या मजल्यावर संपूर्ण भाग जाळीने बांधला म्हणजे कोणत्याही मजल्यावरून उडी मारली तरी ती व्यक्ती त्या जाळय़ातच पडेल व तिचा जीव जाणार नाही. इतकेच नव्हे तर सर्व मजल्यांवरील लॉबीसुद्धा जाळीने झाकल्या जाणार आहेत.

आत्महत्या हा राज्याला लागलेला डाग असून मंत्रालयाभोवती ‘नायलॉन नेट’ बांधणे हा त्यावर उपाय आहे काय? धर्मा पाटील यांनी वरच्या मजल्यावर जाऊन उडी मारली नव्हती, तर मंत्रालयात जाऊन विष प्राशन केले होते हे लक्षात घेतले तर ‘नेट’ची ‘भिंत’ कशी कुचकामी आहे हे लक्षात येईल. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत चार हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या घरात व शेतात झाल्या. एखादा धर्मा पाटील किंवा हर्षल रावते आत्महत्या करण्यासाठी मंत्रालयाच्या दारात पोहोचला. धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांच्या आत्महत्येनंतर मिळाला. मृत्यूपूर्वी ज्या जमिनीची किंमत फक्त चार लाख दाखवली त्याच जमिनीचा मोबदला आता ५४ लाख मिळाला. म्हणजे सरकारी लफंगेगिरी होतीच व न्यायासाठी धर्मा पाटलांना मंत्रालयात घुसून विष प्राशन करावे लागले. सरकारने मंत्रालयात नायलॉनच्या जाळय़ा बसवण्यापेक्षा धर्मा पाटील, हर्षल रावते यांच्यासारख्यांवर आत्महत्या करण्याची वेळच येऊ नये अशी तरतूद करायला हवी. मंत्रालयाचे सोडा, पण दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर एका बेरोजगार युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला.

आता मुख्यमंत्र्यांच्या घराभोवतीही ‘नायलॉन’ची जाळी बांधणार का? कुणी सांगावे, उद्या मुख्यमंत्री किंवा मंत्री जिथे जातील तिथे त्यांच्यासभोवतीही नायलॉनची सुरक्षा जाळी बांधली जातील! बरं, नायलॉनच्या दोरीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. त्यामुळे हे नायलॉनचे दोर म्हणजे अन्यायग्रस्तांची ‘आत्महत्या’ सोय आहे काय? मंत्रालयात तसेच सरकारी कार्यालयांत उंदरांचा सुळसुळाट फारच झाला आहे. हे उंदीर नायलॉनची जाळी सहज कुरतडतील व हे सुरक्षकवच नष्ट होईल. कुरतडलेली जाळी मग लोकांच्या गळय़ाभोवती आवळली जातील. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सवा लाख हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. बुलढाणा जिल्हय़ात मोठेच नुकसान झाले आहे. अमरावती, अकोला, वाशीम, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशीव, हिंगोली, जळगाव हे जिल्हेही गारपिटीने साफ कोलमडले आहेत. आता नुकसानीचे पंचनामे होतील. मदतीच्या घोषणा होतील, पण कोलमडलेला शेतकरी मनाने विकलांग झाला आहे. उद्ध्वस्त झाला आहे. त्याचे मन अस्थिर झाले तर नायलॉनच्या संरक्षक जाळय़ाही त्यास मंत्रालयात घुसण्यापासून रोखू शकणार नाहीत. सरकारच्या उपाययोजना कुचकामी आहेत. आजार पोटाला आहे व प्लॅस्टर पायाला बांधले जात आहे.