गावातील दवाखाने हाऊसफुल : जान है ! तो जहान हैं ! ची रुग्णांमध्ये भावना

रोहित गिरी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरात चिंतेचे वातावरण पसरले असताना. ग्रामीण भागातील जनता मात्र कोरोनाबद्दल अधिक सतर्क असल्याचे सध्या पहायला मिळते आहे. दवाखाना म्हटलं की अंगावर काटा येतो, असं म्हणणारे नागरिक खिशाला लागणाऱ्या आर्थिक कत्रीचा विचार न करता, सर्रासपणे डॉक्टरकडे जायला प्राधान्य देत आहेत.

खोकला, सर्दी, ताप इत्यादिला जास्त महत्त्व न देणारे ग्रामीण भागातील नागरिक सध्या खोकला, सर्दी, ताप अशा साध्या लक्षणासाठी सुध्दा दवाखान्याचा रस्ता धरताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सध्या अनेक दवाखाने गजबजलेले पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर पेशंट आणि डॉक्टर यांच्या समन्वयातून पेशंटमध्ये योग्य ते अंतरही ठेवलेले पाहायला मिळत आहे.

जिंतूर तालुक्यातील अनेक डॉक्टर्सशी बातचीत केली असता, नॉर्मल दिवसांपेक्षा पेशंटमध्ये कमालीची वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. ही वाढ पन्नास टक्के आणि त्याहीपेक्षा अधिक आहे. नागरिकांमध्ये असलेली सतर्कता सुखावह असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला करोना संदर्भात मार्गदर्शन करत असल्याचं ही त्यांनी नमूद केलं.

जान है ! तो जहान हैं !

यावेळी सर्दी, खोकला इत्यादी असलेल्या रुग्णाशी बातचीत केली असता. त्यांनी पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली. ‘दोन दिवसापासून सर्दी आणि खोकला जाणवत होता.  जास्त त्रास नाही, पण कोरोनाच्या भीतीमुळे चेक केलेलं चांगलं म्हणून डॉक्टरकडे आलो. पण वातावरण बदलामुळे सर्दी झाली असल्याचं डॉक्टर म्हणाले. त्यामुळे चिंता मिटली आहे. स्वतःला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सूचना दिल्या. त्या पाळणार आहे.’

पुरुषोत्तम गुठ्ठे ( सर्दी, खोकला असलेला रुग्ण )

हेही पहा –