fbpx

ग्रामविकास विभागाला राष्ट्रीय स्तरावरचे चार पुरस्कार

मुंबई  : शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा निर्णय देशात सर्वप्रथम घेणाऱ्या ग्रामविकास विभागाला राष्ट्रीय स्तरावरचे चार पुरस्कार मिळाले आहेत.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणाऱ्या शासकीय विभागाला ‘स्कोच’ या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेतर्फे पुरस्कार देण्यात येतो. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा ऑनलाईन टिचर ट्रान्स्फर, जिल्हा अंतर्गत बदली प्रकल्प, कॅडर मॅनेजमेंट सिस्टीम आणि लाएबिलीटी रजिस्टर सिस्टीम या योजना यशस्वीपणे राबविल्याने विभागाला स्कोच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्ली येथे कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया सभागृहात स्कोच संस्थेचे संचालक समीर कोचर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ग्रामविकास विभागाच्या वतीने अधिकाऱ्यांनी हे पुरस्कार नुकतेच स्वीकारले.

भारतातील सामाजिक, आर्थिक क्षेत्रात अनेक विकासात्मक प्रकल्प होत असतात. या प्रकल्पांना प्रोत्साहन मिळावे, त्याची माहिती इतरांना मिळावी व ते वापरता यावेत या हेतूने स्कोच संस्था विविध क्षेत्रातून नामांकन मागवते आणि त्यातून काही उत्कृष्ट प्रकल्पांची पुरस्कारासाठी निवड करते. यावर्षी एकूण चार हजार २०० प्रवेशिकांमधून ७८ प्रकल्प निवडले गेले. त्यात महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाने चार पुरस्कार पटकावले.

ग्रामविकासाच्या योजना सरपंचांना ‘सोशल मिडिया’द्वारे कळविणार – पंकजा मुंडे

यासाठी मिळाले पुरस्कार
मंत्री श्रीमती मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन व पारदर्शक करणारे महाराष्ट्र हे देशात एकमेव राज्य ठरले आहे. या निर्णयामुळे लाखो शिक्षकांना न्याय मिळाला, याबद्दल पहिला आंतरजिल्हा ऑनलाईन टिचर्स ट्रान्स्फर पुरस्कार, दुसरा जिल्हा अंतर्गत बदल्यांमधील अडथळे दूर केल्याबद्दल पुरस्कार, तिसरा सर्व जिल्हा परिषदेमध्ये आस्थापना विषयक बाबी ऑनलाईन केल्याबद्दल कॅडर मॅनेजमेंट सिस्टीम अॅवार्ड व राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेला जाणारा निधी, कामाचे टेंडर, कंत्राटदाराची प्रक्रिया, कामाची गुणवत्ता, काम पूर्ण झाल्यानंतर त्याची देयके थेट कंत्राटदाराच्या खात्यात जमा करणे या सर्व बाबी पारदर्शक हाताळण्यासाठी तयार केलेली लाएबिलिटी रजिस्टर सिस्टीम यंत्रणा प्रभावीपणे राबविल्याबद्दल चौथा पुरस्कार विभागाला देण्यात आला.