रुपाली चाकणकरांनी मनसेच्या ‘शॅडो मंत्रिमंडळाची’ची उडवली थट्टा

rupali vs raj

पुणे : गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत.

विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

यातच, महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्री असे अचानक कोरोना ग्रस्त होऊ लागल्याने अनेकांनी शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे. दरम्यान,मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. संदीप देशपांडे म्हणाले की, ‘सावधान सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे, त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो.’ या आरोपानंतर अनेक मविआ समर्थक मला ट्रोल करतील, पण जे सत्य आहे ते बोलणारच, असा इशारा देशपांडे यांनी दिला होता.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देताना मनसेची चांगलीच थट्टा केलेली आहे. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही टीका केलेली आहे, त्या म्हणाल्या कि, “विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी व्हावा म्हणून राज्य सरकार कोरोनाची खोटी आकडेवारी जाहीर करतंय असं मनसेच्या संदीप देशपांडे याचं स्टेटमेंट ऐकण्यात आलं आहे. मला वाटतं आपल्या शॅडो मंत्रिमंडळातील जे कुणी शॅडो गृहमंत्री आहेत त्यांच्याकडून याची चौकशी समिती नेमून योग्य ती शॅडो कारवाई करण्यात यावी” अशा प्रकारे चाकणकर यांनी मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाची थट्टा केलेली आहे.

दरम्यान, ‘अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का?’ असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी केला आहे. सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत, असा आरोपही देशपांडेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या