कोरोना तपासणी करणाऱ्या हॉस्पिटलच्या नावांची सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली यादी खरी आहे का?

coronavirus_1

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात संशयित रुग्णांची कोरोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा घशाचा द्राव (‘नसो फैरिंजीयल स्वाब’) घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या 3 ठिकाणी सुविधा असून मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात. अजून काही दिवसात ही सुविधा केईएम रुग्णालय, मुंबई, हाफकीन यांच्यासह चार ते पाच ठिकाणी वाढविण्यात येणार आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचे आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी येत्या 2 ते 3 आठवड्यात सर्वांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासकीय यंत्रणा 24 तास दक्ष राहून कार्यरत आहेत .गर्दी कमी करणे हा यावर प्रभावी उपाय असून त्यासाठीच्या विविध उपाययोजना प्रशासन करत आहे. जिल्ह्यातील 6 ग्रामपंचायतींच्या निवडणुका, 750 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना, तसेच 1400 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्याच्या कार्यक्रमास सध्या स्थगिती देण्यात येत आहे. नागरिकांनीही शक्यतो लांबचा प्रवास व स्वतः हून गर्दीत जाणे टाळावे तसेच हातांच्या स्वच्छतेबाबत दक्षता बाळगणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सामाजिक शिष्टाचार पाळून स्वतःबरोबरच समाजाची काळजी घ्यावी. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे तसेच एकमेकांसोबतचा संपर्क टाळावा, याबरोबरच लग्न समारंभ आयोजित करण्यास प्रशासनाची बंदी नसून कमीत कमी व्यक्तींच्या उपस्थितीत समारंभ घ्यावा, असे आवाहन करुन आवश्यकता भासल्यास शासकीय व खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या 290 खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत.