रामदास आठवले म्हणतात ‘हातभट्टीची पिण्यापेक्षा रम’बरी

दलित तरुणांना रामदास आठवलेचा अनोखा सल्ला

आपल्या अजबगजब विधानांमुळे कायम चर्चेत असणारे नाव म्हणजे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. आज असाच अनोखा सल्ला त्यांनी दलित समाजातील तरुणांना दिला. दलित तरुणांनी सैन्यात जाव कारण तिथे चांगलं खायला प्यायला मिळतं, शरीर धट्ट कट्ट होतं. तसेच हातभट्टी पिण्यापेक्षा रम चांगली असा सल्ला आठवले यांनी दिला आहे. तसेच दलित समाजातील तरुणासाठी सैन्य दल आणि संलग्न विभागातील नोकरीसाठी विशेष आरक्षण असावे. या बाबत रक्षामंत्र्याशी लवकरच चर्चा करण्यात येणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना रामदास आठवले यांनी महागाई आणि बुलेट ट्रेनच्या मुद्यावर सरकारची पाठराखण केली. देशातील महागाई अजून कमी झाली नाही हे आम्हाला मान्य आहे. मात्र, ज्या घोषणा किंवा आश्वासने देण्यात आली आहेत. त्याची पूर्तता लगेच होणार नसून त्याचे परिणाम येत्या काळात दिसतील. तसेच बुलेट ट्रेन नको म्हणण्याची भूमिका चुकीची असून यापुढे विमान देखील नको अशी भूमिका पुढे येऊ शकते. म्हणत आठवले यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला.