नियम सर्वांना सारखेच, राठोड समर्थकांवर तात्काळ कारवाई करण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश !

uddhav thakrey

वाशिम : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे चिंता व्यक्त होतेय. शिवजयंती दिनी देखील कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले होते. तर, शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर १४४ कलम लावण्यात आले होते. यानंतर रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लाईव्ह येत नागरिकांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी मास्क, सतत हात धुणे आणि शारीरिक अंतर राखणे यासह कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड हे पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, आज ते समोर आले. यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते. बेकाबू गर्दीवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली.पोलिसांचे आदेश झुगारत ५० जणांची परवानगी असताना हजारो समर्थकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. शिवसेनेचे कार्यकर्ते नेते हेच या गर्दीत मोठ्याप्रमाणावर होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला शिवसेनेच्याच मंत्र्याने केराची टोपली दाखवल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. सामान्यांसाठी वेगळे व मंत्र्यांसाठी वेगळे नियम आहेत का ? असा सवाल करण्यात येत होता. मात्र, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नियम मोडणाऱ्यांना फटकारलं आहे. ‘कोव्हीड संदर्भातील नियम जे सर्वांसाठी सारखेच आहेत. त्यामुळे पोहरादेवीतील उपस्थितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी,’ असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहेत.

दुसरीकडे, संजय राठोडांनी कुणाला आमंत्रण दिलं नव्हतं. प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी होती, असं भाष्य शिवसेनेच्या आमदार व नेत्या मनिषा कायंदे यांनी करत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाईचे आदेश दिल्यामुळे मंत्री संजय राठोड यांच्यासह महंत व ज्या कोणी एकत्र जमण्यासाठी आवाहन केलं असेल त्यांच्यावर काय कारवाई होणार ? हे येत्या काळातच समजेल.

महत्त्वाच्या बातम्या