अत्यावश्यक पासच्या नावाखाली टवाळखोरांचा उच्छाद

मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्यानंतर अत्यावश्यक व अन्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने ठराविक व्यक्तींना प्रवेशपत्र देण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावर अन्य ठिकाणी जाण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा प्रवेशपत्रधारकाला पोलिसांकडून सूट मिळते. मात्र, काही प्रकरणात त्याचा गैरफायदा होत असल्याचे वर्धा जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

लॉडाऊन च्या काळात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना सूट मिळावी, यासाठी ही प्रवेशपत्र देण्यात आले होते. मात्र या भरमसाठ प्रवेशपत्रांमुळे गोंधळ वाढत असून रस्त्यांवर जास्त गर्दी व्हायला लागल्याने हे सर्व पास जप्त करण्याचा निर्णय वर्धा जिल्हा प्रशासनाने आज (ता. १) घेतला. यातील त्रुटी लक्षात आल्यानंतर ज्यांना अशा जीवनावश्यक सेवांसाठी प्रवेशपत्र देण्यात आ ले होते, ते रद्द करून जप्त करण्याच्या सूचना पोलीस खात्याला देण्यात आल्या आहेत. उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी याला दुजोरा दिला.

दरम्यान, चौकाचौकात तैनात असणाऱ्या पोलिसांना चहापाणी देण्यासाठी स्वयंसेवक फिरतात. मात्र, एक लिटरचा थर्मास घेवून ठिकठिकाणी वाटपाचे सोंग करत आहेत. त्याचबरोबर औषधं घेण्याच्या नावाखाली देखील सर्रासपणे अशी टवाळकी सुरू असल्याचा फसवा प्रकार उजेडात आला आहे. शहरातील एका पोलिसाने सांगितले की, चौकात तैनात पोलिसांना असा चहापाणी न स्विकारण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे नाहक संपर्क वाढत असल्याचेही दिसून आले आहे. हि बाब लक्षात घेता आता निवडक व अत्यंत महत्वाच्या कामासाठीच प्रवेशपत्र प्रकरणनिहाय दिले जाईल. सर्व सेवा सुरळीत राहण्याची काळजी घेवून प्रवेशपत्राचा विचार होणार असल्याचे यावेळी सुरेश बगळे यांनी सांगितले आहे.