RSS मुलांना देणार लष्करी प्रशिक्षण, लवकरचं सैनिकी स्कूल स्थापन करणार

rss

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता स्वयंसेवकांना लष्करी प्रशिक्षण देणार आहे. त्यासाठी उत्तरप्रदेश येथे सैनिकी स्कूल उघडणार आहे. यामध्ये मुलांना लष्करात अधिकारी बनवण्यासाठीच प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या शाळेच्या संचालनाची जबाबदारी आसएसएसच्या विद्या भारतीकडे दिली जाणार आहे. याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक्स टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.

RSSकडून नेहमी राष्ट्रहितासाठी आणि हिंदू संस्कृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामुळे आता लष्करी बळ वाढविण्यासाठी आणि लष्करात जाण्यास इच्छुक असणाऱ्या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी संघ आता सैनिकी स्कूल उघणार आहे. RSSचे सरसंघचालक राजेंद्र सिंह ऊर्फ रज्जू भय्या यांच्या नावावरून या शाळेचं नाव रज्जू भैय्या सैनिक विद्यामंदिर ठेवण्यात येणार आहे. शाळेची स्थापना उत्तर प्रदेश बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूरमध्ये केली जाणार आहे.

या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये या शाळेत शिक्षणाचे धडे शिकवले जाणार आहेत. या शाळेत सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार असून, इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना इथे शिक्षण घेता येणार आहे. आरएसएसचा हा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यास देशातल्या दुसऱ्या राज्यांतही अशा प्रकारच्या शाळा उघडल्या जाणार आहेत.