लष्कराला वेळ लागू शकतो, मात्र संघाचे स्वयंसेवक तीन दिवसांमध्ये लढण्यासाठी तयार होतील – मोहन भागवत

mohan-bhagwat

टीम महाराष्ट्र देशा: ‘लष्कराला तयारीसाठी पाच सहा महिन्यांचा वेळ लागू शकतो. मात्र संघाचे स्वयंसेवक तीन दिवसांमध्ये लढण्यासाठी तयार होतील’ अस वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल आहे. उत्तरप्रदेशातल्या मुजफ्फरपूर इथं एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केल आहे.

‘संघाचे स्वयंसेवक मातृभूमीच्या रक्षणासाठी कायम तयार असून ते हसत- हसत बलिदान देऊ शकतात. कोणत्याही परिस्थितीसाठी स्वयंसेवक नेहमी तयार असतात. जेव्हा चीन हल्ला करण्याच्या तयारीत होता त्यावेळी स्वयंसेवक सीमेवर लष्कर येईपर्यंत उभे होते. तेव्हा स्वयंसेवकांनी असंही ठरवलं होतं की, जर चीनी सैन्य आलंच तर त्यांना जोरदार प्रतिकार करायचा. त्यामुळे स्वयंसेवकांना जेव्हा जबाबदारी मिळते ती ते चोखपणे बजावतात.’ यावेळी मोहन भागवत अस देखील म्हणाले आहेत.

दरम्यान भारतीय सैन्याचे सामर्थ्य माहित नसणाऱ्या सरसंघचालक मोहन भागवतांच्या या मुक्तफळांवर सर्वच थरातून जोरदार टीका केली जात आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी ट्विटरवरुन भागवतांचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणालेत, ‘जर हे वक्तव्य दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या नेत्याने दिलं असतं तर भाजपच्या लोकांनी त्याला आतापर्यंत पाकिस्तानात धाडलं असतं. मीडियाने तर फाशीच्या शिक्षेची मागणी केली असती. पण आता गोष्ट भागवतांची आहे’.

तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘मोहन भागवत यांनी लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून भारतीय लष्कराचा अवमान केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल तात्काळ सैन्यदलाची माफी मागावी’ अशी मागणी केली आहे.

दुसरीकडे हार्दिक पटेल याने ट्विट करून मोहन भागावत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.