भारताच्या सीमावर्ती भागात देशभक्त लोकसंख्येत घट – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

नागपूर : जगात कुठल्याही देशाचा समीवर्ती भाग हा अतिशय संवेदनशील असतो. त्यामुळे त्याकडे व्यवस्थित लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते. जगात प्रत्येक युध्द हे सैन्य व शस्त्रांनी लढले जात नाही. त्यासाठी देशभक्त जनसमुदाय आवश्यक असतो. गेल्या 70 वर्षात भारताच्या सीमावर्ती भागात देशभक्त लोकसंख्येत घट होते आहे. त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख अरुणकुमार यांनी व्यक्त केली. नागपुरातील हिंदू धर्म संस्कृति मंदिराच्या अमृतमोहत्सवानिमित्त आयोजित व्याख्यान मालेंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा व आमची जबाबदारी या विषयावरील व्याख्यान पुष्प गुंफतांना ते बोलत होते.

याप्रसंगी महानगर संघचालक राजेश लोया आणि गुरुनाथ भागवत प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अरुणकुमार म्हणाले की, दुस-या महायुध्दानंतर जगाचे नेतृत्त्व कुणाकडे यावरून रशिया आणि अमेरिका यांच्यात 45 वर्षे शितयुध्द सुरू होते. त्यानंतर 1990 साली अचानक तत्कालिन युनियन ऑफ सोव्हीएत सोशॅलिस्ट रिपब्लिकन अर्थात युएसएसआर नावाने ओळखल्या जाणा-या रशियाचे 12 तुकडे झालेत. सुमारे महिनाभराच्या कालावधीत एका महासत्तेचे विभाजन ही थक्क करून सोडणारी गोष्ट होती. त्यानंतरच्या काळात जगात आता फक्त अमेरिकेचे एकछत्री साम्राज्य असेल असे वाटू लागले होते. परंतु, 2001 साली झालेल्या 9/11 च्या हल्ल्यात अवघ्या 40 मिनीटात अमेरिकेला हादरवून सोडले. कुठल्याही युध्दाशिवाय तुमचे पानीपत होऊ शकते हे या घटना अधोरेखित करून जातात.

भारताचे शेजारी असलेल्या चीन व पाकिस्तान सारख्या देशांपासून सावध राहण्याची गरज आहे. हे देश, त्यांची धोरणे, दृष्टीकोन एकदम स्पष्ट आहेत. याउलट भारत स्वातंत्र्योत्तर काळापासून कायम गोंधळलेल्या अवस्थेतच राहिला आहे. आमच्यावर सिंकदर, मुगल आणि इंग्रजांची आक्रमणे होऊन त्यांनी अधिपत्य प्राप्त करतपर्यंत आम्ही त्यांच्या संकटाचा कधीच विचार केलेला नाही. अजूनही आम्ही अशा संकटांकडे कानाडोळाच करीत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पाकिस्तान आणि चीनची धोरणे एकदम स्पष्ट असून त्यानुसार त्यांच्या कारवाया सुरू असतात. भारताशी थेट युध्दात जींकणे अशक्य असल्यामुळे पाकिस्तानने दहशतवादाचा आधारा घेतला आहे. अफगाण युध्दात अमेरिकेकडून शस्त्र व पैसा प्राप्त करून तो भारताच्या विरोधात वापरला. आता चीनशी मैत्री करून भारतीय सीमा अशांत करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. हाच प्रकार चीन देखील करीत असून आमचे बुध्दीजीवी, विचारवंत, सैन्य आणि सरकार अजूनही गाफिल आहे.

सीमावर्ती क्षेत्रात विकास आवश्यक देशाच्या सीमावर्ती भागात सातत्याने हालचाली होत असून त्यापासून बोध घेऊन सावध होण्याची गरज आहे. म्यानमार येथून सुमारे एक लाक रोहिंग्यांनी भारतात प्रवेश केला आहे. त्यांचा अधिकृत आकडा 14 हजार असून त्यापैकी 10 हजार जम्मू-काश्मिरात, 3 हजार हैदराबाद येथे आणि उर्वरित मेवाद येथे वास्तव्याला आहेत. हे रोहिंग्या सीमेतून भारतात प्रवेश केल्यानतंर एका रात्रीतून तिथे पोहचले नाहीत. त्यांना बुध्दीपुरस्सरपणे नेवून वसवण्यात आले आहे. याची दखल घेऊन योग्य उपाययोजनांची गरज असल्याचे अरुणकुमार यांनी सांगितले.

मनोवैज्ञानिक वर्गिकरण, बुध्दीभेद वर्तमानात चीन, पाकिस्तान आणि भारताच्या विरोधातील लोक एकवटले आहेत. ते इथल्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करतात. यातूनच दलित, आदिवासी आणि महिलांचे प्रश्न त्यावर वादविवाद, चर्चा घडवून आणल्या जातात. यामध्ये सोशल मिडीयाची भूमिका फार महत्त्वाची आहे. यामाध्यमातून भारतियांचे मतविभाजन करवून देशात अनास्था, अराजकता पसरवली जाते. यासर्व गोष्टींचा उद्देश आपल्याला अनुकूल असे सरकार भारतात असावे असा आहे. तेव्हा या बुध्दीभेदाच्या वर्गिकरणप्रधान खेळीला ओळखून भारताने धोरणे बनवणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे योगदानही तितकेच आवश्यक असल्याचे अरुणकुमार यांनी स्पष्ट केले.