हिंदू समाजात चेतना निर्माण करणे हाच ‘आरएसएस’चा अजेंडा – भूषण दामले

रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा आहे असा प्रचार करून संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संघाचा खरा अजेंडा हिंदू समाजात चेतना निर्माण करून हिंदू असल्याची जाणीव करून देणे हा आहे. धार्मिक महत्त्व न देता गोमातेकडे विज्ञानाच्या चष्म्यातून बघा, असे आवाहन संघाचे प्रचारक भूषण दामले यांनी केले.संगमेश्‍वर तालुक्यातील माखजन येथे आरएसएसच्या कोकण प्रांताच्या माध्यमातून आयोजित हिंदू चेतना संगम कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शशिकांत नलावडे, तालुक्याचे संघचालक दिलीप जोशी यांच्यासह दोनशे स्वयंसेवक उपस्थित होते.तालुक्याचे कार्यवाह अनंत शिगवण यांनी प्रास्ताविक करून संगमेश्‍वर तालुक्यात सुरू असलेल्या संघाच्या कामाबाबत माहिती दिली. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे शशिकांत नलावडे यांनी सांगितले की, मी संघाच्या कार्याने प्रभावित आहे. संघ देशात स्वातंत्र्यापूर्वीपासून देशप्रेमी सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम करीत असून या कार्याला सर्व समाजाने एकमुखी पाठिंबा देण्याची गरज आहे.

प्रचारक दामले म्हणाले, दिवसेंदिवस हिंदू समाजाची अवस्था दयनीय होत चालली आहे. हिंदू समाजातील लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यात कमीपणा समजत आहेत. गोमाता ही देशाची संपत्ती आहे. गोमातेच्या दुधात आरोग्य दृष्ट्या गुण असल्याने तिचे संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी धार्मिक नजर बाजूला ठेवून विज्ञानाच्या चष्म्यातून या गोष्टीकडे पाहणे गरजेचे आहे.