‘रासपला युतीकडून ५७ जागा मिळणार नाहीत’

महादेव जानकर

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपने जागा वाटपांच्या चर्चेला सुरवात केली आहे. तसेच युतीच्या घटक पक्षांनी देखील आपल्याला हव्या असलेल्या जागांची यादी दोन्ही पक्षांना पाठवली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीने या विधानसभेला युतीकडे ८ ते १० जागांची मागणी केली आहे. तर रसपा पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी युतीकडे तब्बल ५७ जागांची मागणी केली आहे. मात्र महादेव जानकार यांना युतीकडून ५७ जागा मिळणार नसल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.

मुंबई प्रदेशचा भव्य रिपब्लिकन कार्यकर्ता मेळावा काल वरळी सरदार वल्लभाई पटेल स्टेडियम एनएससीआय क्लब येथे घेण्यात आला. यावेळी रामदास आठवले मेळाव्याला संबोधित करत होते. यावेळी रामदास आठवले म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत युतीकडून काँग्रेस राष्ट्रवादीचे १२ वाजणार आहेत. तसेच युतीकडून आम्हाला 8 ते 10 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर महादेव जानकर यांनीही 57 जागा मागितल्या आहेत. मात्र, तसे काही होणार नाही, असे आठवले म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकत्र असतील आणि रिपाइंची साथ असेल तर युतीच्या 240 जागा निवडून येतील. भाजप-शिवसेनेच्या मागे रिपाइं पक्ष उभा राहील. मुंबईत पावसात पाणी साठत आहे. त्यामुळे ड्रेनेज सिस्टम व्यवस्थित करणे गरजेचे आहे. तसेच बाबासाहेबांनी सांगितलेला नदी जोड प्रकल्प हाती घेतला पाहिजे, असेही आठवले यांनी सांगितले.