भाजप सेना युतीकडून ‘रासप’ला हव्यात 57 जागा : महादेव जानकर

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मित्र पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजप – सेना युतीकडे 57 जागांची मागणी केली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मागणी केली आहे.

यावेळी जानकर म्हणाले की, राज्यात चांदा ते बांदापर्यंत रासपची मोठी ताकद निर्माण झाली आहे. मागील निवडणुकीत आमचे सहा जिल्हा परिषद सदस्य असताना विधानसभेच्या चार जागा दिल्या होत्या. मात्र आता रासपचे 98 जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे या वेळी विधानसभा निवडणुकीत आम्ही 57 जागांची मागणी करणार आहोत. मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक विधानसभेची जागा रासपला सोडवून घेण्याबाबत आग्रह असणार आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा रासप घटकपक्ष आहे. आतापर्यंत जागावाटपासंदर्भात भाजप व शिवसेनेसोबत दोन बैठका झाल्या आहेत. काही दिवसांत तिसरी बैठक होणार आहे. ज्या ठिकाणी पक्षाची ताकद मोठी आहे, त्या ठिकाणच्या जागा रासपला सोडण्यासाठी आम्ही आग्रही असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.