fbpx

‘रासप कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून कांचन कुल यांच्या पाठीशी रहावं’

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभेच्या माढा आणि बारामती मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती; परंतु राजकारणात काही तडजोडी कराव्या लागतात. युद्धात हरलो असलो तरी, तहात जिंकलो असून राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या पाठीशी राहावं, असं आवाहन पक्षाचे नेते आणि मंत्री महादेव जानकर यांनी केलं.

रासपचा खरा शत्रू राष्ट्रवादी काँग्रेस हाच आहे. भाजप आमचा थोरला भाऊ आहे. आता वाटणीत भाजपाने आमची अर्धा एकर जमीन घेतली. पण आता आपण पाच एकर जमीन घेतलेली सुद्धा त्यांना कळू देणार नाही, असं जानकर म्हणाले.

दरम्यान,बारामतीत कांचन कुल या भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्या तरी राहुल कुल भविष्यातही राष्ट्रीय समाज पक्षातच राहतील, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला. त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपकडून काही घडलं तर आपण त्यावेळी बघू असंही जानकर म्हणाले.