‘गोलंदाज कोणाही असो, चेंडू सीमापार पोहोचवणे हेच ध्येय होते’

टीम महाराष्ट्र देशा- बांगलादेश विरुध्द काल झालेल्या 20 षटकांच्या दुसर्‍या क्रिकेट सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मानं 43 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकार लगावत 85 धावांची झुंजार खेळी केली. त्याचबरोबर 20 षटकांचे 100 आंतराराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-1 अशी बरोबरी केली असून रविवारी नागपुरात होणारा तिसरा सामना आता निर्णायक ठरणार आहे.

100वा t-20 सामना खेळणाऱ्या रोहितने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 2500 धावांचा टप्पाही पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.त्याचे आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 100 सामन्यात 32.52 च्या सरासरीने 2537 धावा झाल्या आहेत. यामध्ये त्याच्या 4 शतकांचा आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे.

तर दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा(Most Runs in T20I) करण्याचा विश्वविक्रमही रोहितच्या नावावर आहे. या यादीत रोहितच्या पाठोपाठ 2450 धावांसह विराट कोहली(Virat Kohli) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान सामन्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना रोहित म्हणाला, राजकोटच्या खेळपट्टीचा मला अंदाज होता. ती खेळपट्टी फलंदाजीला पोषक आहे याची मला कल्पना होती. त्यामुळे गोलंदाजांना त्या खेळपट्टीवर गोलंदाजी करणे जड जाईल असेही मला वाटले. माझा तो अंदाज खरा ठरला. दुसऱ्या डावात गोलंदाजांना खेळपट्टीकडून अजिबात मदत मिळाली नाही. त्याचा फायदा घेत आम्ही पॉवर-प्लेमध्ये तुफान फटकेबाजी केली. त्यानंतर मात्र ती लय कायम राखणे हे एकच आव्हान होते. सामन्याची स्थिती पूर्णपणे माहिती असल्याने गोलंदाज कोणाही असो, चेंडू सीमापार पोहोचवणे हेच ध्येय अशा पद्धतीने मी खेळलो. २०१९ हे माझ्यासाठी चांगले वर्ष ठरले आहे. वर्षाचा शेवटही मला गोड करायचा आहे”, असे रोहितने सांगितले.

महत्वाच्या बातम्या