fbpx

रोहित पवारांच्या मिशन विधानसभेला धक्का, कर्जत-जामखेडच्या जागेवरून आघाडीत बिघाडी?

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड येथून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. मात्र या जागेवर कॉंग्रेसचा हक्क असल्याने ते या जागेवरील दावा सोडण्यास तयार नसल्याने रोहित पवारांच्या मिशन विधानसभेला जोरदार धक्का बसला आहे.

मागील २०१४च्या विधानसभा निवडणुका भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांनी स्वबळावर लढवल्या होत्या. त्यामुळे त्या वेळी ज्या पक्षाने जी जागा जिंकली असेल, त्याच पक्षाकडे ती जागा ठेवण्याचे आघाडीने ठरवले असल्याचे समजते. त्यानुसार नगर शहराची काँग्रेसची जागा आता राष्ट्रवादीचा आमदार असल्याने राष्ट्रवादीकडेच राहणार आहे; मात्र, त्याबदल्यात राष्ट्रवादीने कर्जत-जामखेड जागेवर दावा केला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवारांचे नातू रोहित पवार येथून लढण्यास इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर नगरची जागा राष्ट्रवादीला दिल्याने कर्जत-जामखेडची जागा काँग्रेसलाच राहिली पाहिजे, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांकडून मांडली जात आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसकडून याच एकमेव जागेची रस्सीखेच रंगण्याची चिन्हे आहेत. नगर व कर्जत-जामखेड या दोन जागांसह अकोले, कोपरगाव, नेवासे, श्रीगोंदे, पारनेर, पाथर्डी-शेवगाव व राहुरी या एकूण ९ जागा लढवण्याची तयारी राष्ट्रवादीची आहे तर काँग्रेससाठी संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डीची जागा सोडली जाणार आहे. यातही शिर्डीला लढण्यास काँग्रेस तयार नसेल तर तीही लढवण्याची तयारी राष्ट्रवादीची असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.