fbpx

रोहित पवारांच्या अडचणीत वाढ, गुंड म्हणतात शेवटपर्यंत संघर्ष करणार

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहे. त्यामुळे सगळेच पक्ष आता मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. तसेच इच्छुक उमेदवारांनीही कार्यकर्त्यांच्या बैठका, सभा आणि मेळावे घेण्यात व्यस्त आहेत. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी चुरस पाहायला मिळत आहे.

या मतदारसंघात उमेदवारीसाठी शरद पवार यांचे नातू रोहित पवार इच्छुक आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड याही आग्रही आहेत. याच पार्श्वभूमीवर कुळधरण येथे कार्यकर्त्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि राजेंद्र गुंड यांनी तालुक्यातील इतर नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

त्यांनी ‘आम्ही कार्यकर्त्यांच्या ओळखी करून दिल्या, नावे दिली, फोन नंबर दिले. मात्र रोहित पवारांनी आमच्या तालुक्यात, जिल्हा परिषद गटात येऊन आम्हाला टाळून कार्यकर्ता मेळावे घेतले याचे दुःख झाले. आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितल्याने तालुक्यातील काही नेत्यांना पोटसुळ उठला आहे अशा शब्दात जोरदार टीका केली.

तसेच पुढे बोलताना आम्ही उमेदवारीसाठी शेवटपर्यंत संघर्ष करणार आहोत. सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन कार्यकर्ते ठरवतील तसा पुढचा निर्णय घेऊ असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र गुंड यांनी दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे याचा जबर फटका येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.