कर्जत जामखेड हा मंत्र्यांचा मतदारसंघ आहे की एखाद्या विरोधी आमदाराचा ? – रोहित पवार

blank

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. तसेच अनेक नेते आपआपल्या मतदारसंघात सक्रीय झालेले दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार रोहित पवार यांनी विद्यमान आमदार राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

रोहित पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून मी कर्जत-जामखेड तालुक्यातल्या अनेक गावांत गेलोय. हजारो लोकांना भेटून त्यांच्याशी चर्चा केलीय. हा परिसर पिंजून काढलाय. पण मला कळत नाही हा मंत्र्यांचा मतदार संघ आहे की विरोधी पक्षातल्या एखाद्या आमदाराचा. प्रत्येक गावातला माणूस रस्ता, पाणी, वीज यासाठी तळमळतोय. या गोष्टी काही अशक्य आहेत अशातलाही काही भाग नाही.

लोकांच्या या प्राथमिक गरजा आहेत आणि तो त्यांचा हक्क आहे. चांगल्या सोयी-सुविधा देण्याची गोष्ट लांबच पण हक्कापासूनच त्यांना वंचित राहावं लागतंय. काय म्हणावं याला? दोन गावांना जोडणारे रस्ते हे शेतातल्या रस्त्यासारखे आहेत. थोडा पाऊस आला तरी त्यावरुन पायी चालताही येणार नाही, असे रस्ते आहेत. गुरुवारी जामखेड तालुक्यातल्या जायभायेवाडी, बांधखडक, मुंगेवाडी, गवळवादी आदी गावात जाऊन तिथल्या लोकांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

राखीपौर्णिमा असल्यामुळं प्रत्येक गावात भेटलेल्या भगिनींनी राख्या बांधल्या. हातावर जागा राहिली नाही, एवढ्या राख्यांची श्रीमंती घेऊन घरी आलो. खूप आनंद आणि समाधान वाटलं, पण रस्ता, पाणी, लाईट मिळत नसल्यानं माझ्या भगिनींना सहन करावा लागत असलेला त्रास अस्वस्थ करत होता. लोकांचीही सहनशक्ती संपलीय आता. मुंगेवाडीतली सारिका सुरवसे ही आठवीतली भगिनी तिच्या मैत्रिणींसोबत झेंडावंदन करुन येती. त्यांनी मला रस्त्यातच थांबवलं. मीही उत्सुकतेने थांबून त्यांच्याशी बोललो.

उस्मानाबाद आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवरचं हे गांव आहे. गावात बस येत नसल्यामुळं शाळेत ४ किलोमीटर असलेल्या फकरुड गावात त्यांना पायी जावं लागतं, अशी व्यथा तिने मांडली. हे सांगताना तिच्या शब्दाला धार आणि डोळ्यात संताप स्पष्ट दिसत होता. गावाला रस्ता नाही, पाणी नाही, लाईटही नसल्याचं ती सांगत होती. सत्ताधारी गप्पा मारतात स्त्री सक्षमीकरणाच्या, मुलीच्या शिक्षणाच्या अन इथं तर मुलींना शाळेत जाण्यासाठी ४-५ किलोमीटर पायपीट करावी लागतेय.

कुणी उत्तरं द्यायचे या माणसांना? काय चूक आहे त्यांची? किती दिवस त्यांनी हा त्रास सहन करायचा?पुढच्या काळात हे प्रश्न दिसणार नाहीत त्यासाठी खूप काम करावं लागणार आहे आणि मी प्रामाणिकपणे ते करणार.