सरकारला जनता धडा शिकवेल – रोहित पवार

rohit_pawar

सोलापूर – शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी सरकार फसव्या घोषणा करत आहे. त्यामुळे सरकारला जनता धडा शिकवेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते, पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी व्यक्त केला. येथे खासगी कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पवार म्हणाले, राज्य सरकार कर्जमाफीचा गवगवा करत असले तरी अनेकांना कर्जमाफी मिळाली नाही. केंद्रापासून राज्यापर्यंत सरकारच्या धोरणांचा, निर्णयांचा अनुभव जनता घेत आहे. म्हणूनच सत्ता कोणाकडे सोपवायची याचा निर्णयही जनताच घेईल. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस विविध उपक्रम, आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला आणखी जागृत करत आहे. केंद्रातील आणि राज्यातील दोन्ही सरकारची कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, प्रशासन विषयीची धोरणे, निर्णयांचा अनुभव जनता घेते आहे. अनुभवानंतर जनतेच्या मनात परिवर्तनाचा विचार निश्चितपणेच येणार आहे.

कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. हे सर्वांनाे ठाऊक आहे. अजूनही पवार शेतात, बांधावर जाऊन प्रश्न जाणून घेतात. त्यामुळेच जनतेच्या मनात त्यांच्याविषयी कमालीचा आदर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते जनतेच्या मनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न सातत्याने करीत राहिले आहेत. नव्या पिढीपर्यंत त्यांचे कार्य व विचार पोचवण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या युवा फळीवर आहे असे ते म्हणाले.

बार्शीत आल्यानंतर प्रथम माजी आमदार प्रभावती झाडबुके यांचीही पवार यांनी भेट घेत तब्येतीची चौकशी केली. यावेळी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले उपस्थित होते. पवार यांनी येथील कॅन्सर हॉस्पिटलमधील सुविधा जाणून घेऊन समाधान व्यक्त केले. युवक व महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः युवकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने तोंडातील कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. महिलांनीही नियमित तपासण्या करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात कॅन्सरविषयक व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे म्हटले.