विखेंच्या लोणीत पवारांची ‘साखरपेरणी’; दोन्ही नातवांच्या भेटीची राज्यात चर्चा

blank

­अहमदनगर- दिवंगत खासदार बाळासाहेब विखे आणि शरद पवार यांच्यातील वितुष्ट अवघ्या राज्याने पाहिले आहे. सत्तासंघर्षाची किनार असलेल्या या दोन्ही घराण्यातील वादाची ठिणगी दुसऱ्या पिढीतही कायम राहिल्याचे चित्र आहे. मात्र, पवारांचे नातू आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी डॉ.सुजय विखे पाटील यांची भेट लोणीत भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

प्रवरानगर येथे रोहित पवारांनी प. डॉ. वि. विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपली दावेदारी सांगितली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या कोट्यातील या जागेचा तिढा अद्यापपर्यंत सुटू शकलेला नाही. सुजय विखे यांनी पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढण्याची तयारी दर्शविली आहे. तशा वेगवान हालचालीही सुरु आहेत. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोणी विरुद्ध बारामती

दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील विळ्याभोपळ्याचे सख्य अवघ्या राज्याला ज्ञात आहे. बाळासाहेब विखे पाटील यांनी शरद पवारांना कायम आव्हान दिले. दिल्लीच्या राजकारणात पवारांना आव्हान देण्याची ताकद बाळासाहेब विखेंकडे होती. त्यामुळे राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी दोघे सोडत नसत. “बारामतीकरांनी पाणी पळविल्याने मराठवाडा उजाड झाला” अशी उघड टीका बाळासाहेब विखे जाहीर कार्यक्रमातून करत असत.

राधाकृष्ण विखे विरुद्ध आजित पवार

दोन्ही घराण्यातील सुप्त संघर्ष दुसऱ्या पिढीतही कायम असल्याचे चित्र अनेकवेळा दिसून आले. आघाडी सरकारच्या काळात राधाकृष्ण विखेंच्या नेतृत्वातील मुळा प्रवरा सहकारी वीज कंपनी बरखास्त करण्याची खेळी अजित पवारांनी केली होती. तर सिंचनाच्या मुद्दावरुन राधाकृष्ण विखेंनी अजित पवारांवर आरोप केले होते. दुसरीकडे अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या जागेचा तिढा कायम आहे. अजित पवारांचा ही जागा कॉग्रेसला सोडण्यास एका अर्थाने सुजय विखेंच्याच उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा आहे.

कर्जतसाठी रोहित पवारांना विखेंचे बळ ?

रोहीत पवार आणि सुजय विखेंच्या भेटीने दोन्ही घराण्यांत पुन्हा संवादाचे वारे वाहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत रोहित पवार कर्जतमधून लढणार असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने मोर्चेबांधणीही कार्यकर्त्यांकडून सुरु आहे. त्यामुळे विखेंच्या साथीने पवारांचा विजय सुकर ठरु शकतो. मात्र, दोघांच्या भेटीची चर्चा तर होणारच.