माढ्याचा तिढा वाढला, रोहित आणि पार्थ पवारांच्या चर्चेमुळे मोहिते-पाटील गटात खळबळ

करमाळा- राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढताना दिसत आहे. विद्यमान खा विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी मागील काही दिवसांपासुन जोरदार तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यात केलेल्या दौऱ्याच्या निमित्ताने रोहित यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचे नाव देखील एका गटाकडून पुढे केले जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभेला माढा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्यासाठी चुरस निर्माण झाल्याच दिसत आहे. तर दस्तुरखुद्द पवारांच्या घरातूनच नाव पुढे आल्याने मोहिते पाटील गटात खळबळ उडाली आहे.

पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी मागील आठवड्यात सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला होता. यावेळी जिल्ह्यामध्ये असणाऱ्या युवक कार्यकर्त्यांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. अशातच माढा लोकसभेसाठी त्यांचे नाव चर्चेत येवू लागले आहे. तर दुसरीकडे पार्थ पवार यांना मानणारा गट जिल्ह्यात सक्रीय झाला असून लोकसभेसाठी त्यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. पवार घराण्यातील दोन्ही सुपुत्रांच्या नावावर कार्यकर्त्यांच्या पैजा सुरु झाल्या आहेत.

मतदारसंघ पुनर्रचनेत २००९ साली माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. माढा हा राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. माण,फलटण,सांगोला,माळशिरस,करमाळा,माढा या विधानसभा मतदारसंघाचा माढ्यामध्ये समावेश आहे. २००९ साली माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. पवार यांनी तत्कालीन भाजप उमेदवार आणि सध्याचे विद्यमान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा पराभव केला होता.

२०१४ साली शरद पवार यांनी लोकसभा न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिली. मोदी लाटेत देखील महाआघाडीचे उमेदवार आणि विद्यमान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव करत अटीतटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ असल्याचे बोलले जाते.

राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार लॉबींग सुरू केले आहे त्यामुळे मोहिते-पाटील यांची डोकेदुखी वाढली असतानाचं आता राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यासह पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू झाली आहे. त्यामुळे मोहिते-पाटील गटात खळबळ उडालेली आहे. मात्र शरद पवार सांगितल तोच उमेदवार अंतिम असल्याने सध्यातरी कोणाला उमेदवारी मिळणार याच्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहेत.